ICC Womens World Cup 2025 : पाकिस्तान संघासमोर कांगारूंचे आव्हान

ICC Womens World Cup 2025 : आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी, महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानसोबत खेळणार असून लढतीतील विजयासाठी कांगारूंचा संघ प्रबळ दावेदार असणार आहे. सलग दोन सामने गमावलेला पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत लय मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे.
या जागतिक स्पर्धेत कांगारूंच्या संघाची कामगिरी इतर संघांपेक्षा वेगळी राहिली आहे. कर्णधार अलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील संघाने 300 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे उद्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते आणखी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी उत्सुक असतील. कांगारूंच्या संघाने न्यूझीलंड सारख्या दमदार संघाविरुद्ध 300 धावांचा टप्पा ओलांडला होता व नंतर किवींना 89 धावांनी पराभूत देखील केले होते.
यापुर्वी 7 वेळेस विश्वचषक जिंकणारा कांगारूंचा संघ आठव्या विश्वचषकाच्या विजेतेपदाची तयारी करत आहे. गेल्या सामन्यामध्ये सलामीवीर एलिसा हिली, बेथ मूनी आणि अॅनाबेल सदरलँड यांना संघर्ष करावा लागला तरी अॅश्ले गार्डनरने दमदार शतकी खेळी करताना सामना एकतर्फी केला. फलंदाजीच्या बरोबरीने कांगारूंच्या संघाने चांगली गोलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँड व फिरकीपटू सोफी मोलिनो यांनी न्यूझीलंडच्या संघाला रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पाकिस्ताननंतर कांगारूंच्या संघाला इंग्लंड, भारत व द. आफ्रिका सारख्या मजबूत संघांचा सामना करायाच असल्याने ते उद्याच्या सामन्यात आपली रणनिती सुधारण्यावर भर देतील. कांगारूंच्या संघाने भारतीय उपखंडातील परिस्थितीची चांगली तयारी केली आहे, त्यामुळे त्यांना पाकिस्तानचा संघ आडचणीत आणण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या दोन्ही लढती गमावलेला पाकिस्ताना सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
पाकिस्तानला बांगलादेशने सात गड्यांनी तर भारताने 88 धावांनी पराभूत केले होते. स्पर्धेतील पाकिस्तानची कामगिरी आतापर्यंत निराशाजनकच राहिली आहे. संघामध्ये फलंदाजीतील खोली अभाव असल्यानेच त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये 200 धावांचा टप्पा देखील गाठता आलेला नाही. दोन्ही सामन्यांमध्ये सिद्रा अमीन, फातिमा सना आणि मुनीबा अली यांच्यासरख्या दमदार फलंदाजांना धावांसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला आहे.
याबरोबरीने गोलंदाजीतही कर्णधार सना व डायना बेग या संघर्ष करत आहेत. भारताविरुद्धच्या लढतीमध्ये पाकिस्तानने तब्बल १८ धावा अतिरिक्त दिल्या होत्या. डायना बेगने ४ गडी बाद केले, हीच गोलंदाजीतील समाधानकारक कामगिरी ठरली. ऑस्ट्रेलियाचा संघाचा समतोल, त्यांच्याकडे असणारा अनुभव, उपखंडातील परिस्थितीची जाण असल्याने, पाकिस्तानसारखा दुबळा संघ त्यांच्यासमोर आव्हान उभे करु शकेल याची शक्यता कमी आहे. त्यातच पाकिस्तानने दोन्ही सामने कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळले असल्याने, या गोष्टीचा फायदा उचलण्याचा ते प्रयत्न करतील असे वाटते.





