Match Officials Announce : महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी आयसीसीने जाहीर केलं ‘मॅच ऑफिशियल्स’चं पॅनेल! ४ भारतीय रणरागिणींना मिळाली संधी
Match Officials Announce : २०२४ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या न्यूझीलंडसमोर यंदा विजेतेपद राखण्याचे मोठे आव्हान असेल, मात्र मैदानावरील नियमांचे अचूक पालन करण्याची जबाबदारी या महिला अधिकाऱ्यांवर असेल.

Womens T20 World Cup 2026 Match Officials Announce : आगामी ‘आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६’ च्या रणधुमाळीला १२ जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सलामीच्या लढतीने या महाकुंभाचा पडदा उघडेल. या भव्य स्पर्धेपूर्वी आयसीसीने ग्रुप स्टेजच्या सामन्यांसाठी मॅच ऑफिशियल्सच्या (सामना अधिकारी) नावांची अधिकृत घोषणा केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचे संपूर्ण नियंत्रण महिलांच्या हाती सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयसीसीने घेतला असून, एकूण १४ अंपायर्स (पंच) आणि ४ मॅच रेफरीच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे.
सलग तिसऱ्यांदा सर्व महिला मॅच ऑफिशियल्स!
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासामधील हे सलग तिसरे वर्ष असेल, जिथे घोषित करण्यात आलेले सर्व सामना अधिकारी महिला आहेत. यंदाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण ३३ सामने खेळवले जाणार आहेत. या १८ सदस्यीय पॅनेलमधील ९ अधिकारी अशा आहेत, ज्यांनी २०२४ च्या मागच्या वर्ल्ड कपमध्येही जबाबदारी सांभाळली होती. ऑस्ट्रेलियाच्या क्लेयरे पोलोसाक या पॅनेलमधील सर्वात अनुभवी पंच आहेत. त्या सलग सहाव्यांदा वर्ल्ड कपमध्ये अंपायरिंग करणार असून त्यांच्या नावावर २२ सामन्यांचा अनुभव आहे. त्यांच्यापाठोपाठ जॅकलीन विल्यम्स आणि किम कॉटन यांनी प्रत्येकी १९-१९ सामन्यांत अंपायरिंग केले आहे.
भारताच्या ४ महिलांना मिळाले मानाचे स्थान!
𝐁𝐫𝐞𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐛𝐚𝐫𝐫𝐢𝐞𝐫𝐬. 𝐌𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐡𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲. 👏
The ICC unveils an all-women officials panel for the Women’s T20 World Cup 2026 🏆#CricketTwitter pic.twitter.com/WpRBq6y2Qj
— Female Cricket (@imfemalecricket) May 28, 2026
भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे, आयसीसीच्या या नामांकित पॅनेलमध्ये ४ भारतीय महिलांनी आपले स्थान पक्के केले आहे. यामध्ये तिघींवर अंपायरिंगची तर एका महिला अधिकाऱ्यावर मॅच रेफरीची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. भारताच्या अत्यंत अनुभवी जीएस लक्ष्मी पुन्हा एकदा मॅच रेफरीच्या भूमिकेत दिसतील. त्यांनी २०२४ च्या वर्ल्ड कपमध्येही उत्कृष्ट काम केले होते. त्याचबरोबर अंपायर्स (पंच) म्हणून जननी एन, वृंदा राठी आणि गायत्री वेणूगोपालन या तिघींना मुख्य अंपायर्सच्या पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे.
आयसीसीचे अधिकृत पॅनेल :
अंपायर्स (पंचांचे पॅनेल): जननी एन (भारत), वृंदा राठी (भारत), गायत्री वेणूगोपालन (भारत), लॉरेन एजेनबैग, किम कॉटन, अण्णा हॅरिस, शथिरा जाकीर जेसी, केरिन क्लासे, कॅंडेस ला बोर्डे, निमाली परेरा, क्लेअर पोलोसाक, सुजैन रेडफर्न, एलोइस शेरिडन, जॅकलीन विल्यम्स.
मॅच रेफरी पॅनेल: जीएस लक्ष्मी (भारत), ट्रुडी अँडरसन, शैंड्रे फ्रिट्ज, मिशेल परेरा.





