#U19CWC #INDvAUS | भारतीय वाघांनी केली कांगारूंची शिकार

अँटिंग्वा – कर्णधार यश धुलचे दमदार शतक व शेख रशीद याच्या 94 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला व थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला.
आता भारतीय संघाचा इंग्लंडशी विजेतेपदासाठी सामना होणार असून भारतीय संघाने सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची किमया केली. शतकी खेळी करणारा भारतीय संघाचा कर्णधार यश धुल सामन्याचा मानकरी ठरला.
भारतीय संघाचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सुरुवातीला चांगलाच अंगलट आला. भारतीय संघाचे भरात असलेले सलामीवीर अंगक्रीश रघुवंशी व हरनूर सिंग यांनी साफ निराशा केली. यावेळी भारताची 2 बाद 16 अशी बिकट स्थिती बनली होती. मात्र, कर्णधार यश धुलने शेख रशीदला साथिला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला व आपापली अर्धशतके साकार केली. त्यानंतर त्यांनी धावांचा वेग वाढवला व संघाचे शतक, तर पाठोपाठ द्विशतकही फलकावर लावले. धुलने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना दमदार शतकी खेळी केली. शेख रशीद मात्र, शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर तळातील फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर संघाला 5 बाद 290 अशी भक्कम स्थिती उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून जॅक निस्बेट व विल्यम्स स्लॅजमन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक 291 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 42 व्या षटकांत 194 धावांवर संपुष्टात आला. लॅचलॉन शॉ याने जिद्दी अर्धशतकी खेळी केली. त्याला साथ देताना कौरे मिलर व कॅम्पबेल कॅलाव्ही यांनी थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय गोलंदाजांनी त्यांना एकही संधी दिली नाही व त्यांना 96 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाकडून विकी ओस्तवालने 3 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देत निशांत सिंधू व रवी कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 5 बाद 290 धावा. (यश धुल 110, शेख रशीद 94, दीनेश बावा नाबाद 20, निशांत सिंधू नाबाद 12, जॅक निस्बेट 2-41, विल्यम्स स्लॅजमन 2-57). ऑस्ट्रेलिया – 41.5 षटकांत सर्वबाद 194 धावा. (लॅचलॉन शॉ 51, कौरे मिलर 38, कॅम्पबेल कॅलाव्हे 30, विकी ओस्तवाल 3-42, निशांत सिंधू 2-27, रवी कुमार 2-37).





