U19 World Cup, Raj Limbani Profile : अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात राज लिंबानीने भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने 10 षटकांत 38 धावांत तीन बळी घेतले. या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने एकूण 11 बळी घेतले. मात्र, उत्कृष्ट कामगिरी करूनही टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आले नाही.
ऑस्ट्रेलियाने भारताचा 89 धावांनी पराभव केला. लिंबानी उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. इथंपर्यत पोहचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. गुजरातच्या कच्छमध्ये वाढलेल्या लिंबानीचे वडील शेतकरी आहेत. वडिलांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. आता सीनियर भारतीय संघाकडून खेळण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
लिंबानी क्रिकेटपटू नसता झाला तर त्यानं वडिलांसोबत शेती केली असती. त्याचे वडील वसंत पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, जर तो क्रिकेटमध्ये यशस्वी झाला नाही तर त्याला शेतीही करावी लागेल. पण वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नाला प्राधान्य देत लिंबानी याला क्रिकेटर होण्यासाठी पाठवले.
अशा प्रकारे लिंबानीच्या कारकिर्दीला झाली सुरुवात…
लिंबानी याचे घर बडोद्यापासून 550 किलोमीटर अंतरावर असलेल्या दयापार जिल्ह्यात आहे. हे कच्छ प्रदेशात आहे. इथून पाकिस्तानची सीमा 27 किलोमीटरवर आहे. लिंबानी यांचे घर ओसाड परिसरात आहे. तिथे खेळण्याची अजिबात सोय नाही. अशी परिस्थिती असताना देखील लहानपणापासूनच लिंबानी याला क्रिकेटची असलेली आवड त्याच्या वडिलाच्या लक्ष्यात आली होती. तो आधी टेनिस बाॅलने आणि नंतर कॉर्क बॉलने गोलंदाजीचा सराव केला. कच्छा परिसरात खूप उष्ण आहे. लिंबानी ऊन असूनही तासन्तास अशा वातावरणात वाळूवर गोलंदाजीचा सराव करायचा.
लिंबानीनं एका प्रसिद्ध अकादमीत घेतले प्रशिक्षण…
वडिलांनी लिंबानीला क्रिकेटर होण्यासाठी बडोद्याला पाठवले. तिथे त्याला चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण मिळाले. 2010 मध्ये तो बडोद्यात आला होता. हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांच्यासह युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी ज्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले त्याच अकादमीमध्ये लिंबानी याने प्रशिक्षण घेतले.
डायरीत लिहिले आहे ध्येय….
16 वर्षांखालील भारतीय संघात लिंबानीला पाहून त्याचे प्रशिक्षक दिग्विजय सिंग खूप आनंदित झाले होते. लिंबानी याच्याजवळ एक डायरी आहे. यामध्ये त्याने आपल्या ध्येयाबद्दल लिहिले आहे. त्याला प्रथम अंडर-16 मध्ये खेळायचे होते. त्यानंतर मला अंडर-19 संघात स्थान मिळवाचे होते आणि त्यानंतर एनसीएमध्ये आणि तेथून भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.