दुबई :- दक्षिण आफ्रिकेच्या कासिगो रबाडाने बांगलादेश संघाविरुद्ध भेदक गोलंदाजी करताना भारताच्या जसप्रीत बुमराहकडून कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीतील अव्वल स्थान खेचून आणले. बुधवारी आयसीसीच्या वतीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली. भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी घसरला आहे. बांगलादेश व दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या कसोटीमध्ये आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने पहिल्या कसोटीत तब्बल ९ फलंदाजांना तंबूत धाडताना संघाला मोठा विजय मिळवून दिला. मात्र भारताच्या जसप्रीत बुमराहला न्यूझीलंड विरुद्धच्या पुणे कसोटीमध्ये एकही बळी टिपता आला नाही. त्यामुळे कसोटी क्रमवारीतील त्याला दोन स्थानांचा फटका बसून तो तिसऱ्या स्थानी गेला आहे. कासिगो रबाडाने २०१९ आज्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड व भारताच्या रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. रबाडा जानेवारी २०१८ मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्यानंतर आजपर्यंत तो टॉप १० मध्ये राहिला आहे. फक्त फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याला टॉप १० मधील स्थान गमवावे लागले होते. ऑस्ट्रलियाचा जोश हेजलवूड सध्या दुसऱ्या, बुमराह तिसऱ्या तर अश्विन चौथ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या कसोटीमध्ये ३ गडी बाद करून देखील भारताच्या रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. गेल्या आठवड्यात आपल्या भेदक गोलंदाजीनी इंग्लंडला नामविणाऱ्या पाकिस्तानच्या नोमान अलीने आठ स्थानांनी झेप घेताना थेट टॉप १० मध्ये स्थान मिळविले आहे. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार असलेला मिचेल सँटनरने पुणे कसोटीत १३ गडी बाद केले होते. त्याने थेट ३० स्थानाची झेप घेऊन तो आता ४४ व्या स्थानावर पोहचला आहे. फलंदाजीत देखील भारताची निराशा न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र फलंदाजाच्या क्रमवारीत ८ स्थानांनी झेप घेताना टॉप १० मध्ये आला आहे. फलंदाजीमध्ये अजूनही इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी असून यशस्वी जैस्वालने तिसरे स्थान राखले आहे. मात्र भारताचा ऋषभ पंत व विराट कोहली यांना टॉप १० मधील स्थान गमवावे लागले आहे. ऋषभ पंतला ५ स्थानांचा फटका बसला असून तो आता ११ व्या तर विराट कोहलीला सहा स्थानांचा फटका बसला असून तो आता १५ व्या स्थानी फेकला गेला आहे. यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताचा केवळ १ फलंदाज अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थिरावला आहे.