Men’s T20I Bowling Rankings : भारताच्या अर्शदीपची टॉप 10 मध्ये एन्ट्री…

Men’s T20I Bowling Rankings : – प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या अर्शदीपने क्रमावारीत टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी शुक्रवारी जाहीर केलेल्या टी-20 गोलंदाजाच्या क्रमवारीत अर्शदीपने 8 वे स्थान मिळविले.
या हंगामामध्ये अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. रविवारी ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या लढतीमध्ये अर्शदीपने भेदक गोलंदाजी करताना 14 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले होते. यामुळे अर्शदीपच्या रेटिंगमध्ये सुधारणा होऊन 642 झाली आहे. त्यामुळे त्याच्य क्रमवारीत 3 क्रमांकांनी सुधारणा होऊन तो टॉप 10 मध्ये पोहोचला आहे.
सर्वोत्तम 10 गोलंदाजामध्ये अर्शदीप एकमेव भारतीय गोलंदाज आहे. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारामध्ये इंग्लंडचा आदिल रशीदने अव्वल स्थान पटकावले असून वेस्ट इंडिजचा अकेल हुसेनने दुसऱ्या तर अफगाणिस्तानचा रशीद खान तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा फिरकीपटू रवी बिष्णोईचे देखील 1 स्थान घसरले असून तो आता 12 व्या तर अक्षर पटेल 15 व्या स्थानी आहेत. यादीमध्ये कुलदीप यादवला 20 वे तर जसप्रीत बुमराहला 23 वे स्थान मिळाले आहे.
टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये भारताच्या हार्दिक पांड्याने 4 स्थानांनी सुधारणा केली असून तो थेट तिसऱ्या स्थानी आला आहे. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या लढतीमध्ये हार्दिक पांड्याने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 16 चेंडूत 2 षटकार लागवताना 39 धावांची खेळी करताना 1 गडी देखील बाद केला होता. या यादीमध्ये इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोनने अव्वल स्थान राखले असून नेपाळचा दीपेंद्र सिंग आयरी दुसऱ्या स्थानावर आहे. वॉशिंग्टन सुंदर देखील 35 व्या स्थानावर पोहोचला आहे.





