ICC T20 Rankings : गिल-जैस्वालची क्रमवारीत मोठी झेप; अष्टपैलू हार्दिक पांड्या टॉप-5 मधून बाहेर…

ICC Latest T20 Rankings & Indian Players : भारतीय फलंदाज शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-20 मालिकेतील चांगल्या कामगिरीचा खूप फायदा झाला आहे. गिल आणि जयस्वाल यांनी या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. एकीकडे जैस्वालला टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांचा फायदा झाला आहे. दुसरीकडे गिलने 36 स्थानांची जबरदस्त झेप घेतली आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत झिम्बाब्वेचा 4-1 ने पराभव केला आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी शुभमन गिल 73व्या स्थानावर होता. या मालिकेतील 5 सामन्यात त्याने 42.5 च्या सरासरीने 170 धावा केल्या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. गिल आता 36 स्थानांच्या बढतीसह 37 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय, यशस्वी जैस्वाल आधीच टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यात 70.5 च्या सरासरीने 141 धावा केल्या. या कामगिरीमुळे तो सहाव्या स्थानावर आला आहे.
India players rise in the latest ICC Men’s Player Rankings after T20I series win in Zimbabwe 📈 https://t.co/cgUD1BKQp7
— ICC (@ICC) July 17, 2024
टॉप-10 मध्ये 3 भारतीय…
एकीकडे यशस्वी जैस्वाल टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत 743 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आला आहे. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादव 797 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर कायम असून, या यादीत फक्त ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड त्याच्या पुढे आहे. ताज्या टी20 क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 844 रेटिंग गाठली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
इंग्लंडचा फिल सॉल्टही संयुक्त दुसऱ्या स्थानावर कायम आहे. सूर्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग नव्हता. त्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पुन्हा नंबर 1 स्थान मिळवण्याची संधी आहे. टॉप-10 मध्ये समाविष्ट असलेल्या 3 भारतीयांमध्ये शेवटचे नाव ऋतुराज गायकवाडचे आहे, जो एका स्थानाने खाली घसरून 8 व्या क्रमांकावर आला आहे. गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील 3 डावात 133 धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा पाच स्थानांच्या नुकसानासह 42व्या स्थानावर घसरला आहे. भारताच्या रिंकू सिंगला झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही आणि ती मिळाल्यावर तो काही कमाल करू शकला नाही. त्याला क्रमवारीत आठ स्थानांचे नुकसान झाले असून तो आता 49व्या स्थानावर घसरला आहे.
वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीत फायदा…
कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे दोघेही झिम्बाब्वे दौऱ्यावर गेले नाहीत आणि दोघांनाही गोलंदाजी क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आहे. अक्षरची क्रमवारीत चार स्थानांनी घसरण झाली असून तो टॉप-10 मधून 13 व्या क्रमांकावर गेला आहे आणि कुलदीप यादव चार स्थानांनी घसरून 16 व्या क्रमांकावर आला आहे. रवी बिश्नोईला चार स्थानांचे नुकसान झाले असून तो आता 19व्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनाही ताज्या टी-20 क्रमवारीत नुकसान सोसावे लागले असून, दोघेही अनुक्रमे 21व्या आणि 23व्या स्थानावर घसरले आहेत. वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी क्रमवारीत जबरदस्त 36 स्थानाा फायदा झाला आहे, तो आता 46व्या क्रमांकावर आला आहे. मुकेश कुमारलाही क्रमवारीत 21 स्थानांचा बंपर फायदा झाला असून तो आता 73 व्या क्रमांकावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूत हार्दिकची घसरण…
हार्दिक पांड्या हा झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेचा भाग नव्हता आणि आता तो टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत टॉप-5 मधून बाहेर पडला आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक संपताच, हार्दिक अव्वल नंबरचा टी-20 अष्टपैलू खेळाडू बनला होता, परंतु त्यानंतर वानिंदू हसरंगाने पुन्हा नंबर-1 चा मुकुट मिळवला आहे . चार स्थानांच्या नुकसानासह हार्दिकची आता सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलनेही क्रमवारीत एक स्थान गमावले असून तो आता 13व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजीसोबतच वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही झेप घेतली असून तो आठ स्थानांनी पुढे 41व्या स्थानावर पोहोचला आहे. शिवम दुबेला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत 35 स्थानांचा फायदा झाला असून तो आता 43व्या क्रमांकावर पोहचला आहे.
संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही
झिम्बाब्वेविरुद्धची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाने टी-20 क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतानंतर, आशियातील टी-20 संघ क्रमवारीत दुसरा संघ पाकिस्तान आहे, जो सध्या 7 व्या स्थानावर आहे.





