ICC ODI World Cup 2023 : पाक संघाचा बिनशर्त सहभाग

लाहोर :- भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला दिली आहे.
भारतातील सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केल्यामुळे मुळातच त्यांच्या मंडळावर टीका होत होती. त्यातच भारतात ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होत असून ज्या शहरांत पाकिस्तानचे सामने होणार होते त्याबाबतही त्यांचे मंडळ नाखुष होते.
मात्र, बीसीसीआयने सामन्यांची ठिकाणे बदलण्याची त्यांची मागणी फेटाळल्याने त्यांनी स्पर्धेतूनच अंग काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यावरही बीसीसीआयने हे कृत्य हास्यस्पद असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर पाक मंडळाने त्यांच्या सरकारकडे भारतात ही स्पर्धा खेळण्यासाठी जाण्याबाबत परवानगी मागितली होती व अखेर सरकारने त्यांना परवानगी दिली असून आता या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ बिनशर्त सहभागी होणार आहे.





