ICC Champions Trophy 2025 (BCCI vs PCB) :- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) धक्का बसू शकतो. एकीकडे पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे आणि आता भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे समोर आले आहे. भारताच्या सामन्यांसाठी दोन ठिकाणे बीसीसीआयने आयसीसीला सुचवली आहेत. मात्र, त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे.
बीसीसआयने टीम इंडियाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची मागणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यांनी आयसीसीला आपले सामने श्रीलंका किंवा दुबईमध्ये आयोजित करण्यास सांगितले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक समोर आले होते. ज्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. पीसीबीने यासाठी वेळापत्रकाचा मसुदा तयार करून तो आयसीसीला सादर केला आहे. यानंतर आयसीसीकडून सर्व सहभागी देशांचे क्रिकेट बोर्ड यावर मत मांडत आहेत. पीसीबीनुसार, भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. पाकिस्तानने संपूर्ण स्पर्धेसाठी तीन ठिकाणे निवडली आहेत. ज्यामध्ये लाहोरशिवाय रावळपिंडी आणि कराची ही नावे आहेत. पीसीबीचे म्हणणे आहे की जर भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्यांचे सामने लाहोरमध्येच होऊ शकतात. मात्र, या सामन्यांचे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही आणि आता भारतीय संघ या सामन्यांसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचेही वृत्त समोर आले आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआय आयसीसीला भारताचे सामने पाकिस्तानऐवजी दुबईत आयोजित करण्यास सांगणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया कप मालिकेतही भारत खेळायला गेला नव्हता. त्यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत झाले.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान खेळवली जाईल, 10 मार्च हा अंतिम फेरीसाठी राखीव दिवस असेल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) स्पर्धेतील 15 सामन्यांचा मसुदा आयसीसीकडे पाठवला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 संघांच्या बोर्डाची संमती घेतल्यानंतरच आयसीसी या वेळापत्रकाला मान्यता देईल. 1 मार्च रोजी लाहोरमध्ये पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी भारताचा सामना होऊ शकतो. मात्र, या सामन्यासाठी बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही. आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ सदस्याने ही माहिती दिली.
पीसीबी अध्यक्षांनी 15 सामन्यांचे वेळापत्रक ठरवले
1996 नंतर प्रथमच पाकिस्तान मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. मात्र, 2008 मध्ये पीसीबीने संपूर्ण आशिया कपचे आयोजन केले होते आणि गेल्या वर्षीही आशिया चषकातील काही सामने पाकिस्तानमध्ये झाले होते. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी 15 सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्यात आले आहेत.