“१४ कोटींचा बँक बॅलन्स, ७ अपार्टमेंट अन् २ बंगले…” ; IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड

IAS Murari Lal Tayal। हरियाणा केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी मुरारी लाल तायल यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुरारी लाल तायल यांच्याकडील तब्बल १४ कोटींचा बँक बॅलन्स, ७ अपार्टमेंट आणि २ बंगले जप्त केले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) सुरू असलेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत मुरारी लाल तायल यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मालमत्तेची किंमत कोट्यवधींच्या घरात IAS Murari Lal Tayal।
ईडीने जप्त केलेल्या एकूण मालमत्तेची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. यामध्ये चंदीगड, नवी दिल्ली आणि गुडगाव येथील दोन अलिशान बंगले आणि ७ अपार्टमेंटसह १४.०६ कोटी रुपयांच्या बँक बॅलन्सचा समावेश आहे. तायल यांच्यावर केलेल्या कारवाईची ईडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, २००५ ते २००९ या काळात मुरारी लाल तायल यांनी हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. भूपिंदर सिंग हुड्डा यांचे प्रधान सचिव असताना आणि सीसीआयचे सदस्य असताना मुरारी लाल तायल यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून तायल यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
ईडीकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी IAS Murari Lal Tayal।
सीबीआयने या प्रकरणात दाखल गुन्ह्यानंतर (एफआयआर) ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत तायल यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात तायल यांची पत्नी सविता तायल आणि मुलगा कार्तिक तायल यांच्या आर्थिक नोंदी आणि त्यांची आयकर विवरणपत्रे आणि इतर आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करत आहे.





