आळंदीकरांना रोज पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करेन – मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदी: आळंदी नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी कार्यभार स्वीकारताच सक्रियपणे कामाला सुरुवात केली आहे. हरिपाठ उद्यानाजवळील ह.भ.प. गुरुवर्य शांतीनाथ महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर १३ नव्या पथदिव्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात झालेल्या या सोहळ्यास पालिकेचे बांधकाम अधिकारी सचिन गायकवाड, विष्णूकुमार शिवचरण, संजय घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, दीपक पाटील, उमेश कुऱ्हाडे, मनोज कुऱ्हाडे, संकेत वाघमारे, अनिल वाघमारे, अशोक कांबळे, अशोक उमरगेकर, रंगनाथ महाराज, माऊली बनसोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी खांडेकर यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.
“आळंदीकरांना रोज पाणी देण्याचा संकल्प” –
सन्मानापूर्वी बोलताना खांडेकर म्हणाले, “वडिलांच्या पुण्याईने मला तीर्थक्षेत्र आळंदीत सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा आलो तेव्हा माऊलींच्या संजीवन समाधीवर नतमस्तक झालो आणि त्यांना सेवा करण्याची संधी मागितली. माऊलींनी ती संधी दिली असून, मी ती सोनं करेन. मागील मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी शहरात विकासाचा मजबूत पाया घातला; त्याचप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन मी काम करेन.” त्यांनी पाणी समस्येवर विशेष भर दिला. “गेल्या दोन दिवसांत सर्वांनी पाण्याची समस्या सांगितली. हा दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत ही समस्या निर्माण झाली असून, मी तिच्या मुळाशी जाण्याचा आणि दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन. माझ्या कार्यकाळात आळंदीकरांना रोज पाणी मिळेल, यासाठी प्रयत्न करेन,” असं आश्वासन त्यांनी दिलं.
पथदिवे आणि पाण्यासाठी योजना –
खांडेकर पुढे म्हणाले, “जिथे पथदिवे नाहीत, तिथे निधी आणून ती समस्या सोडवली जाईल.” संजय घुंडरे यांनी पाणी समस्येची तीव्रता मांडली. “सध्या चार-पाच दिवसांनी पाणी मिळतं; ते रोज मिळावं. तीर्थविकास आराखड्यातील पाइपलाइनमधील दोष आणि दोन दहा लाख लिटरच्या टाक्यांची गरज आहे,” असं त्यांनी सांगितलं. प्रकाश कुऱ्हाडे यांनी नदीपलीकडील हवेली विभागात टाकी बांधल्याने समस्या वाढल्याचं नमूद केलं. खांडेकर यांनी १५-२० दिवसांत या समस्येचा उलगडा करून रोज पाण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. “सरकारकडून निधी आणून ही समस्या मिटवेन,” असंही ते म्हणाले. नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या या सक्रियतेमुळे आळंदीकरांमध्ये आशा निर्माण झाली आहे.





