‘मी मोदी साहेबांना विनंती करेन, भारत – पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होऊ द्या’ – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. शाहिद आफ्रिदी यांनी माध्यमांशी बोलतांना पाकिस्थान आणि भारताचा क्रिकेट सामन्याबाबत विधान केले आहे.
शाहिद आफ्रिदी म्हणाले की,’भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ‘अधिक जबाबदारी’ दाखवली पाहिजे कारण ते ‘खूप मजबूत बोर्ड’ आहे आणि दोन क्रिकेट राष्ट्रांमधील संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटला परवानगी देण्याची विनंती करणार आहे. मी मोदी साहेबांना विनंती करेन की, दोन देशांदरम्यान क्रिकेट होऊ द्यावे.’ असे म्हणत शाहिद आफ्रिदी यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
दोहा येथे लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) च्या निमित्ताने शाहिद आफ्रिदी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या वेळी ते म्हणाले,’जर एखाद्याशी आपल्याला मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलत नसेल तर आपण मैत्री कशी करू शकतो? बीसीसीआय हे खूप मजबूत बोर्ड आहे यात शंका नाही, पण जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. अधिक शत्रू बनवण्याचा प्रयत्न न करता, तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही आणखी मजबूत होतात.’ असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.





