पुणे | मी पर्वतीमधूनच निवडणूक लढणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “मी पर्वतीमधूनच निवडणूक लढणार’ असे विधान करत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पक्षातील इच्छुकांवर निशाणा साधला आहे. विधिमंडळ अधिवेशतात शहर तसेच मतदारसंघातील उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती मिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपकडून काही माजी पदाधिकारी इच्छूक असून, त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. यावर मिसाळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मिसाळ म्हणाल्या, या मतदारसंघातून अतिशय प्रतिकूल परस्थितीत मी निवडणूक लढविली. येथून मी आमदार झाले, तेव्हा भाजपचे ६ नगरसेवक होते.
त्यानंतर ही संख्या २३ वर गेली. कार्यकर्ते माझ्यासोबत असून, कसबा मतदारसंघाबाबत माझे नाव घेतले जात आहे. पण, अन्य कोणत्याही मतदारसंघांऐवजी मी पर्वतीमधूनच लढणार आहे. शेत खूप सुपीक दिसते, तेव्हा त्यावर अनेकजण तुटून पडतात. पण, जेव्हा वाळवंट असते तेव्हा कोणीही बघत नाही,’ असेही आमदार मिसाळ म्हणाल्या.
अधिवेशनात उपस्थित केले ५३ प्रश्न
अधिवेशनात शहराचे ५३ प्रश्न विचारल्याचे आमदार मिसाळ यांनी सांगितले. त्यात जनता वसाहत येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रकल्प (एसआरए) राबविणे, महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्ट्यांमध्ये एसआरए राबविणे, पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांच्या जागा मालकीच्या करून देणे,
ससून रुग्णालयातील गुन्हेगारांचा अड्डा, अमली पदार्थांचे रॅकेट यासह शहरातील अन्य प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. हे विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, योग्य कार्यवाही करण्याचे आदेश अधिवेशनात शासनाने दिल्याचेही त्या म्हणाल्या.





