मला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता, आयुर्वेदिक वैद्यांकडून उपचार घेतल्यानंतर त्रास कमी झाला – राज्यपाल कोश्यारी

कार्ला/ पुणे – ऍलोपॅथी, होमिओपॅथी या वैद्यकशस्त्रात केवळ शारीरिक व्याधीबाबत विचार केला जातो. मात्र आयुर्वेद हे त्याहून पुढे जात शरीरातील आत्माच्या शुद्धीबाबत उपचार प्रदान करते. आयुर्वेद शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचार आणि अध्यात्मिक उत्थान देखील करते. त्यामुळेच आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म यांचे महत्व जाणून घेत, आपली जीवनशैली संतुलित केली पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. आयुर्वेद तज्ज्ञ पद्मश्री डॉ.बालाजी तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. संतुलन आयुर्वेद व बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे आयोजित हा कार्यक्रम कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेज येथे संपन्न झाला.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, बालाजी तांबे फाउंडेशन’च्या अध्यक्षा वीणा तांबे, बालाजी तांबे हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मालविका तांबे, संतुलन आयुर्वेदाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे , संतुलन आयुर्वेदाचे जर्मनीतील व्यवस्थापकीय संचालक संजय तांबे उपस्थित होते. आयुर्वेद, संतुलित जीवन प्रणाली आणि भारतीय संस्कृती यांचा जगभरात प्रचार व प्रसार करणारे डॉ. तांबे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भारतीय उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदाचे महत्व परदेशामध्ये वाढत आहे. भारतातील अनेक वैद्य हे ही उपचार पद्धती शिकून परदेशात त्याचा अवलंब करत आहेत. आत्मशांतीसाठी सांगण्यात आलेल्या योग, ध्यानधारणा यांचा अंगीकार तेथील नागरिक करत आहेत. मात्र आपल्याच देशात या उपचार पद्धतीकडे म्हणावे तसे महत्व दिले जात नाही. संतुलित आणि सुदृढ जीवनशैलीसाठी आयुर्वेद, योग, ध्यान, अध्यात्म हे अतिशय महत्वाचे आहेत.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात आयुर्वेद आणि योगमुळे झालेल्या फायाद्याबाबत सांगताना कोश्यारी म्हणाले, मला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. अनेक औषधोपचार करूनही ते कमी झाले नव्हते. मात्र आयुर्वेदिक वैद्याने सांगितलेल्या उपचारांचे पालन केल्यानंतर तो त्रास कमी झाला. तसेच योगमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होत असल्यानेच आज मी तुमच्यामध्ये येऊन इथे बोलू शकत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मालविका तांबे यांनी केले, तर सुनील तांबे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले.





