‘भर कोर्टात माझे शारीरिक शोषण झाले’; यूपीतील महिला न्यायाधीशांची सरन्यायाधिशांकडे इच्छामृत्यूची मागणी

लखनौ – यूपीच्या बांदा जिल्ह्यात नियुक्त असलेल्या महिला न्यायाधीशाने इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजीआय) पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले, भर कोर्टात माझे शारीरिक शोषण झाले. मी इतरांना न्याय देते, पण मी स्वतः अन्यायाला बळी पडले.
मी न्यायमूर्ती म्हणून न्यायासाठी याचना केल्यावर ८ सेकंदात सुनावणी होऊन संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जनतेला न्याय देईन या विचाराने मी नागरी सेवेत रुजू झाले. मात्र माझ्यावरच अन्याय होत आहे. आता माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मला मृत्यूची परवानगी द्यावी, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
महिला न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी बाराबंकी जिल्हा बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर केला होता. त्याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता मी कोर्टात काम करत होते. दरम्यान, बार असोसिएशनचे सरचिटणीस आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनेक वकिलांसह कोर्ट रूममध्ये दाखल झाले.
माझ्याशी गैरवर्तन करू लागले. यावेळी शिवीगाळ करून खोलीतील वीज बंद करण्यात आली. वकिलांना बळजबरीने हाकलून दिले. यानंतर त्यांनी मला धमकी दिली. याबाबत आम्ही तक्रार केली, पण सुनावणी झाली नाही. मात्र या घटनेबाबत बार असोसिएशनने कामकाजावर बहिष्कार टाकला होता, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.





