‘फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मी सुद्धा घाबरलो होतो, मोदींनीही चौकशी केली…’; मुख्यमंत्री शिंदे काय? म्हणाले वाचा…

मुंबई – काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या पाहणीचे काम केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या महार्गाला देण्यात आलं आहे. दरम्यान, या मार्गाची पाहणी करताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी देवेंद्र फडणवीस हे ड्रायविंग सीटवर बसले होते, तर एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवित मुख्यमंत्री शिंदे यांचे सारथी बनले असल्याचं दिसून आलं होत. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे सुरुवातीला खरच घाबरले होते. स्वतः शिंदे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “यापूर्वी जेव्हा मी समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी गेलो होतो तेव्हा मीच गाडी चालवली. मात्र यावेळी देवेंद्रजींनी गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची ड्रायव्हिंग मला माहिती नव्हती म्हणून सुरुवातीला जरा धाकधूक झाली होती.
यासंदर्भात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चौकशी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, ‘कैसा रहा सफर..’ अशी विचारणा मोदींनी केल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी 4 डिसेंबर रोजी पाहणी दौरा केला आहे. समृद्धी महामार्गामुळे 16 ते 18 तासांचे अंतर सहा ते सात तासांवर येणार आहे.
मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील तसेच उद्योगधंदे वाढतील. शेतकऱ्यांनाही दळणवळणास मदत होईल. अनेक जिल्हे या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण देखील होणार आहे.




