Anupama Parameswaran : ‘मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती’; एक्स बॉयफ्रेंडच्या वागणुकीमुळे मानसिकरित्या खचली, अभिनेत्रीने सांगितला वेदनादायी काळ
Anupama Parameswaran : माजी प्रियकरासोबतच्या नात्यात आपल्याला मानसिक त्रास आणि नैराश्याचा सामना करावा लागल्याचे अभिनेत्रीने सांगितले.

Anupama Parameswaran : तेलुगू अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण टप्प्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने माजी प्रियकरासोबतच्या नात्यावर उघडपणे भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
माजी प्रियकरासोबतच्या नात्यात आपल्याला मानसिक त्रास आणि नैराश्याचा सामना करावा लागल्याचे अभिनेत्रीने सांगितले. या नात्यादरम्यान आपल्या व्यक्तिमत्त्वापासून ते अभिनय कारकिर्दीपर्यंत अनेक गोष्टींबाबत आपल्याला न्यूनगंड निर्माण झाला होता, असे अनुपमा म्हणाली.
ध्यान वर्माच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अनुपमा म्हणाली “मी अशा परिस्थितीत होते, जिथे मला अभिनेत्री असल्याची आणि आत्मविश्वासू असण्याचीही लाज वाटू लागली होती. एक स्त्री म्हणून मासिक पाळी येणे हीदेखील माझ्यासाठी न्यूनगंडाची बाब बनली होती. मी पूर्वी ११ मुलांचा विचार करायचे. पण आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला आणखी मुलं नको आहेत. मला स्त्री असल्याबद्दल आणि माझ्या कर्तृत्वाबद्दलही वाईट वाटत होतं.” असा खुलासा तिने केला.
लग्न आणि साखरपुड्यासाठी तिच्यावर दबाव
अनुपमाच्या म्हणण्यानुसार, माजी प्रियकरासोबतचे तिचे दोन वर्षांचे नाते हे मानसिक छळापेक्षा कमी नव्हते. तो तिला सतत त्रास द्यायचा. तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. याशिवाय वैयक्तिक आयुष्यापासून ते करिअरपर्यंत प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू लागला होता. या नात्यात तिला राहणे असह्य झाले होते. लग्न आणि साखरपुड्यासाठी तिच्यावर दबाव आणला होता. मात्र, तिने त्याला नकार दिला. या धक्कादायक अनुभवामुळे आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे अनुपमाने स्पष्ट केले.
अभिनेता ध्रुव विक्रमबद्दल बोलत असल्याचा अंदाज
अनुपमाने माजी प्रियकराचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर काही चाहत्यांनी ती अभिनेता ध्रुव विक्रमबद्दल बोलत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तेलुगू चित्रपसृष्टीत अनुपमा आणि अभिनेता ध्रुव विक्रम यांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अनुपमाने स्वतः त्याचे नाव घेतलेले नसल्याने या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘प्रेमम’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण
अनुपमा परमेश्वरन ही प्रामुख्याने तेलुगू, मल्यालम आणि तमिळ चित्रपटसृष्टीत काम करणारी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१५ मध्ये यशस्वी मल्यालम चित्रपट ‘प्रेमम’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने तिच्या सहजसुंदर अभिनयशैली आणि मनमोहक सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोडी’, ‘वुन्नाधि ओकाते जिंदगी’, ‘कार्तिकेय २’ आणि ‘डबल स्मार्ट’ या चित्रपटातील भूमिकांमुळे तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.


