“… मला फक्त हसन मुश्रीफ यांना पाडाचंय” ; सरोज पाटील यांचे वक्तव्य

बारामती : “माझ्यापेक्षा शरद पवार हा लहान आहे. त्याची तब्येत बरी नसते. तरी तो एवढा फिरतो. माझ्यातही ताकद नाही. माझा भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, त्याचं वाईट वाटतं. मी घरी कशी बसू? कोल्हापूरमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून येणार. मला फक्त हसन मुश्रीफ यांना पाडाचंय,” असे वक्तव्य शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील यांनी बारामतीत केले.
बारामती येथे डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरोज पाटील बोलत होत्या.
सरोज पाटील म्हणाल्या, “लोकशाही टिकवा, भाजपला चिरडून टाका. माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे. यामुळे मला रात्रभर झोप येत नाही. भाजपची ही विषवल्ली मुळासकट उपटली पाहिजे. सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडत आहे. प्रतिगामी शक्ती डोकेवर काढत आहेत, हे पाहून अतिशय वेदना होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सरोज पाटलांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “आमची आई म्हणायची जे समाजाचा संसार करतात, त्याचा संसार समाजानं करायचा असतो. शरद पवार आणि एन. डी. पाटील राजकारणाचा जोडे बाजूला ठेवायचे आणि घरात यायचे. आमच्या आई वडिलांना सगळ्यात लाडका जावई एनडी होते. फाटका जावई लाडका होता, असे त्या म्हणाल्या.





