“मी बोलताना चुकलो, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर..”; चंद्रशेखर बावनकुळेंनी कबुल केली चूक

Chandrashekhar Bawankule | नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एका चुकीची प्रामाणिकपणे कबुली दिली आहे.
बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात शिक्षणात हिंदी भाषेचा समावेश आहे कारण ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा आपल्या अस्मितेची भाषा आहे. मराठी भाषेसाठी सरकार पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. सर्वच प्रशासकीय पातळीवर मराठीत कामकाज चालावं अशी भूमिका आमच्या सरकारची आहे. पण आता यावर राजकारण होत आहे.”
पुढे ते म्हणाले, “मी काल खरंतर बोलताना चुकलो की, हिंदी ही ‘राष्ट्रभाषा’ म्हणण्याऐवजी ‘राजभाषा’ म्हणायला हवं होतं. कारण हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ही राष्ट्रभाषा आहे. यासाठी माझ्यावर काही लोकांनी टिका-टिप्पणी केली. पण या देशात एखादं विकासाचं पाऊल घेतल की, त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.”
एखादी कॉमन भाषा असावी
“जर देशात एखादी राष्ट्रीय पॉलिसी येत असेल तर त्यात हिंदी विषय जर अभ्यासक्रमात आला असेल, तर त्याला इतकं मोठं राजकारण करुन,आंदोलन करणे, लोकांना मारहाण करणे हे योग्य नाही. हिंदी भाषा देखील प्रत्येकाला आली पाहिजे, देशात सगळीकडं फिरत असताना एखादी कॉमन भाषा असावी. देशातील जवळपास ६० टक्के राज्यांमधील कारभार हा हिंदीतून चालतो. त्यामुळं त्या त्या राज्यांच्या भाषेची अस्मिता ठेवून त्यांना हिंदी आली पाहिजे. मला वाटतं यात काही गैर नाही, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. Chandrashekhar Bawankule |
बावनकुळे राज ठाकरेंची भेट घेणार?
शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. याबाबबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, “राज साहेबांना माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे. कारण एखादा विषय एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल तर हिंदीचाही विषय आपल्या शिकण्यात, बोलण्यात समावेश असला पाहिजे. मी राज ठाकरेंना भेटून त्यांना आपल्याला राष्ट्रीय पॉलिसी लागू करावी लागेल, अशी विनंती करेन,” असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. Chandrashekhar Bawankule |
हेही वाचा :





