Solapur News: सोलापुरात खळबळ…! प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील ख्यातनाम डॉक्टर आहेत. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने वळसंगकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वत:च्या डोक्यात झाडून घेतल्या. गोळीचा आवाज येताच कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे धावले.
ताबडतोब डॉ. शिरीष वळसंगकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना डॉ. शिरीष वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतः च्या डोक्यात गोळी का झाडून घेतली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोसर्जन होते. केवळ सोलापूरच किंवा महाराष्ट्रचं नाही तर जगभरात त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे. शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदूरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे. त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं आहे? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.





