Nevasa News : “पती अपघातात गमावला…पण न्याय मिळत नाही!”; पत्नीची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक”

नेवासा (जि. अहमदनगर) : “पतीचा जीव गेला, पण आरोपी वाहनाचा तपासच होत नाही… तोपर्यंत संबंधित पोलिस हवालदाराचे वेतन थांबवा!” अशी भावनिक मागणी अपघातात पती गमावलेल्या पत्नीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दीड महिना उलटूनही वाहनावर कारवाई नाही
ही धक्कादायक घटना ३० मार्च २०२५ रोजी हंडीनिंमगाव (ता. नेवासा) येथील अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडली होती. या अपघातात गोगलगाव येथील फिरोज पठाण या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला दीड महिना उलटून गेला असतानाही अद्याप अपघातग्रस्त वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
अपघातग्रस्ताच्या पत्नीचे गंभीर आरोप
तपास अधिकारी पोलिस हवालदार संजय माने यांच्यावर अपघातग्रस्ताच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, “घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे दिले असतानाही संजय माने हे मुद्दाम टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मी दोन अपत्यांसह अडचणीत सापडले आहे.”
पत्नीचा मुख्यमंत्री फडणवीसांकडे हृदयस्पर्शी अर्ज
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आसमा पठाण म्हणतात की, या अपघातात आमच्या कुटूंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे माझ्यावर आणि माझ्या दोन मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. असं असतांना नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय माने या अपघाताच्या गुन्ह्यातील वाहनावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आपण या पोलीस हवालदाराचे वेतन रोखावे, अशी मागणी आसमा पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, मुख्यमंत्र्यांकडून लवकरात लवकर कठोर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





