Dhananjay Munde – उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिल्याचा दावा केला जात होता. पण आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपण राजीनामा वगैरे काहीही दिला नसल्याचे स्पष्ट केले. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी संशयाची सूई धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याकडे जात आहे. पर्यायाने बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांसह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांत जवळपास तासभर चर्चा झाली. त्यात मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा दावा केला जात होता. पण धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला जाण्यापूर्वी हा दावा फेटाळला. मी मंत्रिपदाचा राजीनामा वगैरे काहीही दिला नाही, असे जोर देत म्हणाले. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्याचाही दावा केला जात आहे. पण मुंडे यांनी स्वतःच उपरोक्त स्पष्टोक्ती दिल्यामुळे या दाव्यातील हवा निघाली आहे. विशेषतः अजित पवार यांनी यासंबंधी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचीही माहिती आहे.