Fatima Sana Shaikh: ‘मी नेहमीच विद्रोही राहिलेय, जे वाटलं ते बोलले’; फातिमा सना शेखने सांगितलं ‘हुंकार’मधील भूमिकेचं गुपित!
Fatima Sana Shaikh ‘हुंकार’ची कथा 17 वर्षांच्या मीनू रावत या मुलीभोवती फिरते. या कथेत एका गंभीर सामाजिक विषयाला वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या नजरेतून मांडण्यात आले आहे. वकील, पोलीस अधिकारी आणि पीडित मुलगी अशा प्रत्येक पात्राचा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.

Fatima Sana Shaikh: अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या तिच्या नव्या वेब सीरिज ‘हुंकार’मुळे चर्चेत आहे. बालकलाकार म्हणून ‘चाची 420’मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या फातिमाने पुढे ‘दंगल’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता ‘हुंकार’मध्ये ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरिजच्या निमित्ताने फातिमाने तिच्या भूमिकेबरोबरच अभिनयाचा प्रवास, कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा आणि स्वतःच्या स्वभावाबद्दलही मोकळेपणाने सांगितले.
‘हुंकार’ची कथा नेमकी काय आहे?
‘हुंकार’ची कथा 17 वर्षांच्या मीनू रावत या मुलीभोवती फिरते. या कथेत एका गंभीर सामाजिक विषयाला वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या नजरेतून मांडण्यात आले आहे. वकील, पोलीस अधिकारी आणि पीडित मुलगी अशा प्रत्येक पात्राचा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
फातिमाच्या मते, या सीरिजची खासियत म्हणजे कथेत अनेक आवाज आहेत. एकाच विषयावर प्रत्येक व्यक्तिरेखा आपली भूमिका आणि विचार मांडते. त्यामुळे प्रेक्षकांना केवळ एका बाजूची कथा न पाहता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेता येते.
पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका
‘हुंकार’मध्ये फातिमा सना शेख एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. गंभीर विषयावर आधारित कथा असल्यामुळे या भूमिकेसाठी भावनिक आणि मानसिक तयारीही महत्त्वाची होती. मात्र शूटिंगदरम्यान तणाव कसा हाताळते, याबद्दल बोलताना फातिमा म्हणते की कलाकाराचं खरं काम ‘अॅक्शन’ आणि ‘कट’च्या मधल्या काळात असतं. शॉटपूर्वी ती संवादांची तयारी करते. अनेकदा अनेक टेक द्यावे लागतात. मात्र एकदा अभिनयाचा प्रवाह सापडला की कलाकाराला स्वतःचा रिदम मिळतो आणि काम सहज होत जाते.

Fatima Sana Shaikh
‘एका आयुष्यात अनेक आयुष्य जगता येतात’
फातिमासाठी अभिनय म्हणजे केवळ कॅमेऱ्यासमोर संवाद बोलणे नाही. तिच्या मते, प्रत्येक भूमिका कलाकाराला काहीतरी नवीन शिकवते. एखाद्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारताना त्या पात्राचं आयुष्य जगण्याची संधी मिळते.
आपल्या खऱ्या आयुष्यात कदाचित जे अनुभव कधीच मिळणार नाहीत, ते अभिनयामुळे अनुभवता येतात. त्यामुळे एका आयुष्यात अनेक वेगवेगळी आयुष्य जगण्याची संधी कलाकारांना मिळते, असं फातिमा सांगते.
‘मी नेहमीच खूप विद्रोही राहिले’
फातिमा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. स्वतःच्या स्वभावाबद्दल बोलताना तिने आपण लहानपणापासूनच विद्रोही स्वभावाची असल्याचं सांगितलं. तिला एखादी गोष्ट योग्य किंवा चुकीची वाटली तर ती ती बोलून दाखवते. हा स्वभाव तिच्या कुटुंबातूनही आला असल्याचं ती सांगते. तिचे आई-वडीलही आपल्या विचारांबाबत स्पष्ट होते आणि त्यांनी फातिमा आणि तिच्या भावाला समानतेने वाढवलं.
घरातून मिळालेला हा समानतेचा आणि पाठिंब्याचा अनुभव तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. फातिमाच्या मते, घरात मुलांना समान वागणूक आणि आधार मिळाला, तर बाहेर कोणी काही बोललं तरी स्वतःची भूमिका मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
‘इंडस्ट्रीमध्ये नेहमी सुरक्षित वाटलं’
चित्रपटसृष्टीतील महिलांच्या अनुभवांबाबतही फातिमाने आपला अनुभव सांगितला. बालकलाकार म्हणून काम सुरू केल्यानंतरही तिला अनेक चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली, असं ती म्हणते. फातिमाने करण, सोनाली बोस, नितेश तिवारी, राज सिंह चौधरी, विवेक सोनी, मेघना गुलजार आणि तरुण यांसारख्या निर्मात्यांसोबत काम केल्याचा उल्लेख केला. त्यांच्या सेटवर तिला नेहमी सुरक्षित वाटल्याचं ती सांगते.
तिने आतापर्यंत अनेक मजबूत व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तिच्या मते, या निर्मात्यांमध्ये संवेदनशीलता आणि समानतेची भावना होती. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्वतःला सुरक्षित आणि सन्मानित वाटल्याचं फातिमा सांगते.
‘हुंकार’मधील तिची भूमिका आणि सीरिजचा गंभीर विषय यामुळे ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. फातिमाच्या मते, कथेत प्रत्येक पात्राचा आवाज स्वतंत्रपणे ऐकू येतो आणि हाच या कथेचा महत्त्वाचा भाग आहे.





