‘अमित शहांच्या विरोधात माझ्याकडे पेनड्राइव्ह’; I-PAC छाप्यावरून कोलकाता रॅलीत ममता बॅनर्जी कडाडल्या

कोलकाता: ‘I-PAC’च्या कार्यालयावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) टाकलेल्या छाप्यांनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढवताना ममता बॅनर्जी यांनी एक खळबळजनक दावा केला. “माझ्याकडे अमित शहांच्या विरोधात पेनड्राइव्ह असून, योग्य वेळ आल्यावर मी तो पुरावा जनतेसमोर मांडेन,” असा इशारा त्यांनी दिला.
कोळसा घोटाळ्याचा पैसा दिल्लीपर्यंत –
रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोळसा घोटाळ्याचा पैसा भाजपच्या दिल्लीतील मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचतो. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी कोळसा घोटाळ्यातील पैशांचा वापर केला असून तो पैसा अमित शहा यांना पाठवला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “माझ्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. जर कोणी मला छेडले, तर मी त्यांना सोडणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.
#WATCH | Kolkata | TMC Chairperson and West Bengal CM Mamata Banerjee leads a rally following the ED raid on I-PAC yesterday. pic.twitter.com/puAMdQLKB3
— ANI (@ANI) January 9, 2026
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
यावेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगात बसलेली व्यक्ती अमित शहांच्या सहकार विभागाचे सचिव होते, असा दावा करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “हरियाणा आणि बिहारमध्ये भाजपने जबरदस्तीने सत्ता मिळवली आहे. आता असाच प्रयत्न बंगालमध्ये सुरू आहे, पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
‘महाराष्ट्रातील निवडणूक भाजपने चोरली’
भाजपवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. “भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रातील निवडणूक चोरली आहे. आता वैध मतदारांची नावे हटवून आणि ‘विशेष गहन दुरुस्ती’च्या (SIR) नावाखाली बंगालमध्येही तेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्तांतर झाले, त्यावर भाष्य करत त्यांनी भाजपच्या निवडणूक रणनीतीवर सडकून टीका केली.
बंगालमध्ये भाजपचा विजय अशक्य
“भाजपने कितीही प्रयत्न केले तरी ते बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकणार नाहीत. बंगालमध्ये केवळ तृणमूल काँग्रेसच (TMC) जिंकेल आणि त्यानंतर आम्हाला दिल्लीही जिंकायची आहे. भाजप देशाला योग्य दिशा देऊ शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, बंगालमध्ये बोलणाऱ्यांना बांगलादेशी ठरवण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.





