‘त्या’ विषयावर मला बोलायचे नाही? सुरेश धस यांच्या मस्साजोग भेटीवर जरांगेंची प्रतिक्रिया

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार सुरेश धस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे विशेषत: या मुद्द्यावर विशेष आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तथापि धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी आल्यामुळे विषयाला वेगळेच वळण मिळाले असून धस आणि जरांगे यांच्यातच आता बिनसले असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात एका वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार धस आणि मुंडे यांच्या भेटीवरून मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांनी भेट घेतली. आपल्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे.
मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे धस यांच्या दाव्यानुसार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धस यांना दिलेला पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर तुम्ही टीका केली होती, मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असा प्रश्न यावेळी जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर त्या विषयात मला काही बोलायचं नाही, तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता, समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं, एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती.
तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना, तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं, मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असे आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होते. मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो, मात्र मी धनंजय मुंडे यांना भेटू शकत नाही, असेच त्यांनी स्पष्ट म्हणायला हवे होते असे जरांगे यांनी म्हटले आहे.





