IND vs SL 3rd T20 : ‘मला कर्णधार व्हायचं नाही तर…’ मालिका जिंकल्यानंतर सूर्यानं केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा…

Suryakumar Yadav : श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा नियमित टी-20 कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. शेवटचा टी-20 सामना जिंकणे कठीण वाटत असले तरी, सूर्यकुमार यादवने स्वतः शेवटचे षटक टाकले आणि सामना बरोबरीत सोडवला, जो भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
मात्र, सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार बनण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेले विधान चर्चेत आहे. साहजिकच संपूर्ण मालिकेत संघाच्या अतुलनीय कामगिरीनंतर संघाच्या कर्णधाराने असे विधान केल्यास आश्चर्य वाटेल पण, सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सूर्याने कर्णधारपद सोडण्याबाबत काहीही बोलले नाही, उलट त्याला कर्णधार नव्हे तर संघाचा लीडर व्हायचे आहे, असे त्याचे संपूर्ण विधान आहे. तसेच सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्यामागील कारण म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण. तसेच कालच्या सामन्यात कठीणप्रसंगी सूर्या स्वत: गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सूर्याने गोलंदाजी करत एका षटकांत 5 धावा देऊन 2 विकेटही पटकावल्या आणि सामन्याचे चित्रच पलटून टाकले. यातूनच त्याने दाखवून दिले की, त्याला कर्णधार नव्हे तर खरच लीडर व्हायचे आहे.
पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मला वाटतं शेवटच्या षटकांपेक्षा जास्त, जेव्हा आम्ही 4 बाद 30 आणि 5 बाद 48 च्या आसपास होतो, तेव्हा खेळाडूंनी दाखवलेली पात्रता अप्रतिम होती. त्यातच त्यांनी खेळ श्रीलंकेपासून दूर नेला, हे एक चांगले होते. या खेळपट्टीवर 140 पार धावसंख्या ही योग्य होती आणि आम्ही जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आलो तेव्हा मी खेळाडूंना सांगितले की, ‘मी असे खेळ पाहिले आहेत जर आपण दीड तास मनापासून खेळलो तर आपण जिंकू शकतो.’
#TeamIndia Captain @surya_14kumar led from the front throughout the series and he becomes the Player of the Series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/UYBWDRh1op#SLvIND pic.twitter.com/MoReOCXtDH
— BCCI (@BCCI) July 30, 2024
सूर्या पुढे म्हणाला की “जर तुम्हाला 200-220 धावसंख्या करण्यात आणि सामना जिंकण्याचा आनंद वाटत असेल, तर तुम्ही 4 बाद 30 आणि 5 बाद 70 अशा परिस्थितीचाही आनंद घ्यावा. कारण, यामुळे तुमच्या आयुष्यात संतुलन निर्माण होते आणि त्यामुळेच तुम्ही पुढे जाता आणि नम्र राहता. खरं सांगायचे झाले तर, खेळाडूंकडे जेवढे कौशल्य-आत्मविश्वास आहे, त्याचा त्यांनी मैदानात वापर केला आणि त्यामुळे माझे काम सोप्पे झाले. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये त्यांची सकारात्मकता,एकमेकांप्रती काळजी हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे.”
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव म्हणाला की, “दुसऱ्या सामन्यानंतर मी म्हणालो, काही मुले आता विश्रांती घेणार आहेत आणि तेव्हा ते म्हणाले की, ‘ठीक आहे आम्ही विश्रांती घेऊ आणि तुम्ही इतरांना संधी देऊ शकता. यावरून संघाचे चारित्र्य आणि ते इतरांच्या कामगिरीवर किती आनंदी आहेत हे दिसून येते. यामुळे माझे काम आणखी सोप्पे झाले.
जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा माझ्यावर थोडे दडपण असते, पण अशावेळी मला व्यक्त होण्यात मजा येते आणि हेच मी मालिकेपूर्वी सांगितले होते की, “मला कर्णधार व्हायचे नाही, मला लीडर व्हायचे आहे.”
दरम्यान, सूर्यकुमार यादव याची टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. सूर्याने आपल्या पहिल्या नेतृत्वात भारताला 3-0 ने असा निर्विवाद मालिका विजय मिळवून दिला . सूर्याने या मालिकेत केवळ नेतृत्वातच नाही तर फलंदाजीसह आपल्या गोलंदाजीतही चमक दाखवली. आणि त्यामुळेच सूर्याला या मालिकेतील तिन्ही सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.





