Mouni Roy : कोण काय म्हणत, याची मला पर्वा नाही; ट्रोलिंग करणाऱ्यांना मौनी रॅायने फटकारलं
Mouni Roy : आता या टीकेवर तिने भाष्य करत आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितलं.

Mouni Roy : डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात वरुण धवनच्या खोट्या आईची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री मौनी रॉयला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता या टीकेवर तिने भाष्य करत आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगितलं.
लोक काय बोलतात किंवा सोशल मीडियावर कोणत्या प्रतिक्रिया देतात, याकडे तिने फारसे लक्ष दिले नाही. तिच्यासाठी महत्त्वाचे होते ते दिग्दर्शकाची कल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकार करणे, असे तिने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाली मौनी?
“या भूमिकेवरून खूप चर्चा झाली.निर्माते माझ्यासोबत असे कसे करू शकतात? असे प्रश्नही उपस्थित झाले. पण मला नेमकं काय करायचं आहे, हे माहीत होतं. माझे दिग्दर्शक आनंदी होते आणि चित्रपटातील सहकलाकारांनाही माझं काम आवडलं होतं. त्यामुळे लोकं काय म्हणतात याकडे मी फारसं लक्ष देत नाही आणि त्याची मला पर्वा नाही. ” अशा शब्दांत तिने टोलर्सना फटकारले.
या भूमिकेची ऑफर मिळाल्याचा अनुभव सांगताना तिने खुलासा केला की, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी सर्वप्रथम तिला याबाबत संपर्क साधला होता. “जेव्हा मला वरुण धवनच्या आईची भूमिका असल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘काय? आईची भूमिका?’ पण नंतर डेव्हिड धवन आणि संवाद लेखक फरहाद सामजी यांच्याकडून कथा ऐकल्यानंतर मी खूप हसले. संपूर्ण प्रसंगच इतका मजेशीर होता की ही भूमिका करण्यासाठी मी लगेच तयार झाले,” अशाप्रकारे मौनीला भूमिका मिळाल्याचे तिने सांगितले.
डेव्हिड धवन यांच्याबद्दल बोलताना मौनीने त्यांच्यावरील आदर व्यक्त केला. “मी त्यांच्या चित्रपटांची खूप मोठी चाहती आहे. त्यांचे चित्रपट पाहिले की मन हलकं होतं. हा एक कॉमेडी चित्रपट होता आणि मला पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळत होती,” असं ती म्हणाली.
तिने पुढे सांगितले की, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला जाणीवपूर्वक चर्चेपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली, जो चित्रपटाच्या दृष्टीने योग्य निर्णय ठरला.
दरम्यान, ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहेत. तर जिमी शेरगिल, मौनी रॉय, मनीष पॉल, चंकी पांडे आणि राकेश बेदी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला बॅाक्स अॅाफिसवर अपेक्षित यश मिळवता आले नाही.






