‘कागदावरच्या नेत्यांना मी उत्तर देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीचा पाहणी दौरा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती काय आहे हे सरकारला समजण्यासाठी आपण इथे आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही यावेळी टीका केली.
सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे असे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. त्यानंतर आता संकटग्रस्त लोक अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात,’ असा खोचक टोला शिवसेनेने सामनामधून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
“जे ऑफिसमध्ये बसून टीका, राजकारण करतात त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती समजूच शकत नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांना जाऊन भेट दिली नाही, त्यांचे अश्रू पुसले नाहीत. इथे येऊन अश्रू पाहिले असते ना तर अशा प्रकारचे बोलायचे त्यांची हिंम्मत झाली नसती. त्यामुळे अशा लोकांना का उत्तर द्यायचं? हे कागदावरचे नेते आहेत. हे अग्रलेख लिहून नेते झालेले लोक आहेत त्यामुळे त्यांना काही मी उत्तर देत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.





