Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार निलेश लंके हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा लंके चर्चेत आले आहेत, पण एका वेगळ्याच कारणामुळे. आढळराव या श्रीगोंदे तालुक्यातील 548 डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके काल (गुरुवारी) काम करणारे ठेकेदार आणि अभियंता यांना फैलावर घेत कानशिलात लगाविल्याची चर्चा होत होती. अखेर स्वतः निलेश लंके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिली आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. नेमकं काय घडलं? श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548चे आढळगाव शिवारातील काम रखडल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनस्थळी खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या कामाबाबत संताप व्यक्त केला. आढळगाव गावठाण हद्दीमधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलं आहे. त्यावेळी काम का रखडले? असा प्रश्न लंके त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला केला. मात्र, यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी उपअभियंता व ठेकेदार कंपनीच्या कामगाराच्या कानशिलात लगावलीची चर्चा गुरुवारी दिवसभर केली जात होती. काय म्हणाले लंके? आढळगाव येथे आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. मात्र, आढळगाव ते जामखेडपर्यंतच्या अपूर्ण कामात हलगर्जीपणा झालेला आहे. यापुढे तो होऊ देणार नाही, असे लंके माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले. रस्त्याचे काम रखडल्याने अधिकारी, ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निलेश लंके पोलीस ठाण्यात रात्री आठपर्यंत ठाण मांडून बसल्याची माहिती आहे.