“राहुल गांधी यांना पंतप्रधान बनताना पाहू शकू” – डी.के.शिवकुमार
Rahul Gandhi | D.K. Shivakumar – कॉंग्रेस पक्षाचा इतिहास हा देशाचा इतिहास आहे. कॉंग्रेसची ताकद ही देशाची ताकद आहे. गांधी परिवाराने कॉंग्रेसला एकत्र ठेवले. तर, कॉंग्रेसने देशाला एकजूट ठेवले. अन्यथा, देशाचे विविध भागांत विभाजन झाले असते, अशी भूमिका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी शनिवारी मांडली.
दिल्लीत घटनात्मक आव्हाने या विषयाशी संबंधित कायदाविषयक संमेलन संपन्न झाले. त्यामध्ये बोलताना शिवकुमार यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना २०२९ यावर्षी भाजपला केंद्रातील सत्तेवरून हटवण्यासाठी एकोप्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
अतिशय निष्ठेने, बांधिलकीने कार्य करून कॉंग्रेसने आपला देश वाचवला. योग्य अजेंडा हाती घेऊन कार्य केल्यास २०२९ मध्ये आपण कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनताना पाहू शकू.
त्यासाठी आपण वचनबद्ध असायला हवे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. दिवंगत नेते मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवण्यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याग केला, असे भाष्यही शिवकुमार यांनी केले.





