पुणे जिल्हा | मी व माझे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार

इंदापूर, (प्रतिनिधी) – पवार साहेबांनी सांगितले मी इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेचा कानोसा घेतलेला आहे. तुम्ही आमच्या पक्षात यावे, असा आग्रह,स्वतः पवार साहेबांनी माझ्याकडे धरला. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरचंद्रजी पवार पक्षात येण्याबद्दल आग्रह धरला.
मी लगेच सांगितले मला इंदापूरला जावे लागेल.कार्यकर्त्यांचा विचार घेतो त्यानुसार,तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्यामुळे मी व माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार आहोत, असा निर्णय घेत असल्याची माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथील दूधगंगा येथे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवार, (दि.४) रोजी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.
युवक नेते राजवर्धन पाटील,अंकिता ठाकरे पाटील,यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे माहिती देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,गुरुवारी आमच्या कार्यकर्त्यांना फक्त एक एसएमएस पाठवला.
आपल्याला राजकीय निर्णय घ्यायचा आहे.याबद्दल आपण काय करायचे म्हणून,निरोप दिला या अल्पशा कालावधीमध्ये देखील प्रचंड संख्येने कार्यकर्ते इंदापुरात दाखल झाले.
तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या भावना मी दोन महिन्यापासून ऐकतो आहे. तालुक्यातील कार्यकर्ता व जनतेचा आग्रह आहे की,तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा.
यासाठी इंदापूर विधानसभेसाठी नेमका कोणता निर्णय घ्यायचा,यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील काही दिवसात समक्ष भेटलो.अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तब्बल दोन तास सविस्तर चर्चा झाली.मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडली,त्यांनी सांगितले की आता निवडणूक लढवायचे असेल तर, येथील इंदापूर विधानसभेची जागा जे विद्यमान सदस्य आहेत, त्यांना सोडलेली आहे.
दुसरा काय पर्याय हर्षवर्धन पाटील तुमच्या बाबतीत काढू ,असे देवेंद्र फडणवीस मला म्हणाले,व्यक्तीश: मला दुसरा पर्याय स्वीकारणे,बरोबर वाटले नाही. राजकारणात,समाजकारणात व्यक्तिगत निर्णय आपल्या प्रश्नासाठी,घ्यायचा नसतो.
आपल्या मागे जी जनता आहे. ती जनता काय म्हणते आहे.हे ऐकायचे असते.म्हणून राजकीय निर्णय घेत आहे, असा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला.
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप आला. उद्या आपण मला सिल्वर ओकला भेटायला या.यापूर्वी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेट झाली होती.
यामध्ये पवार साहेबांनी मला तुम्ही राजकीय निर्णय काय घेतला, हे विचारले होते.त्यामध्ये विस्ताराने चर्चा झाली नव्हती.मात्र पवार साहेबांबरोबर सिल्वर ओकवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बाहेर दौऱ्यावर होते. त्यांची देखील भ्रमणध्वनीवर बोलणे झाले.अशीही माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना दिली.
पत्रकार परिषदे अगोदर इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक,गावचे सरपंच कार्यकर्ते यांची संयुक्त निर्णय बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा आवाज कार्यकर्त्यांनी घुमवला.
जनतेच्या उद्रेकामुळे निर्णय…
भारतीय जनता पार्टीचे जे आमचे जुने सहकारी होते.त्यांच्याशीही मी या प्रवेशा संदर्भात बोललो आहे.मला जनतेची भूमिका महत्त्वाची वाटते.कोणतीही सत्ता नसताना तब्बल दहा वर्ष तालुक्यातील जनता माझ्या मागे उभी राहिली.
लोकांना खूप त्रास झाला. गावागावात अन्याय झाला.विकास कामांऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला. म्हणूनच जनतेचा उद्रेक इंदापूर तालुक्यात निर्माण झाला आहे. म्हणूनच हा निर्णय घेत आहे.अशीही माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.





