आजच्या पिढीच्या वाचनाबद्दल मला चिंता – निशिगंधा वाड

पुणे – आईमुळे मी लिहिती झाले. तिच्या पहिल्या लेखनाचे आम्ही वाचक असायचो. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले, तरी पहिली कविता मराठीत केली होती. आजकालच्या पिढीच्या वाचनाबद्दल मला चिंता वाटते. या पिढीने किती मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा किती मराठी लेखकांची नावे त्यांना माहिती आहेत, याबाबत शंका वाटते. त्यामुळे दिवाळी अंकासारखी ज्ञानगंगा, आपली अभिरुचीसंपन्नता जपणे गरजेचे आहे, असे मत अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी मंगळवारी व्यक्त केले.
दिनमार्क पब्लिकेशनच्या वतीने स्व. कमलाबाई रसिकलाल धारीवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्या अंकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्ध कवयित्री सिसिलिया कार्व्हालो, स्पर्धेचे परीक्षक माधव राजगुरू, प्राजक्ता शिलेदार आणि संयोजक दिनकर शिलेदार या वेळी उपस्थित होते.
दिवाळी अंक म्हणजे मराठी माणसांचा मानबिंदू आहेत. प्रतिभेला वाव देत लेखक घडविण्याचे श्रेय दिवाळी अंकांनाच दिले पाहिजे. दिवाळी अंकांची संख्या वाढत असल्याचा आनंद आहे, असे सासणे म्हणाले. दिवाळी अंक ही लेखकांसाठीची प्रयोगशाळा आहे. दिवाळी अंकांमुळे साहित्य निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असली, तरी त्यांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.
विज्ञाननिष्ठ समाजामध्ये ज्योतिषविषयक दिवाळी अंक सर्वाधिक खपाचे आहेत, हे वास्तव आहे. दिवाळी अंकांचे व्यासपीठ छोटे असले, तरी त्याचा आवाका मोठा आहे, असे प्रा. जोशी यांनी नमूद केले. माझ्या ललित गद्य लेखाला पुरस्कार मिळाल्याचा याचा आनंद आहे, अशी भावना कार्व्हालो यांनी व्यक्त केली. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

