पुणे जिल्हा | “मीच योग्य उमेदवार…” ; जुन्नर विधानसभेसाठी इच्छुकांचा भरणा

नारायणगाव, {मंगेश रत्नाकर} – जुन्नर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत डझनभर इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यापैकी अनेकांनी गावभेट दौरे सुरू केले आहे. एकीकडे तालुक्यातील महाविकास आघाडी व महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची पक्षप्रमुखांकडे रस्सीखेच सुरू असून प्रत्येक उमेदवार मीच योग्य उमेदवार असल्याचे शक्ती प्रदर्शन करीत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील गाव भेट दौर्यात मतदारांना आपण निवडणूक लढविणार असल्याची जाणीव करून देत आहे.
जुन्नर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची संख्या बघता जुन्नर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चौरंगी अथवा पंचरंगी होऊ शकते. महाविकास व महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता संभ्रमात असून आपली ठोस भूमिका स्पष्ट करीत नसल्याचे दिसून येते. महाविकास आघाडी व महायुतीच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास आपली भूमिका काय असेल? असे विचारले असता आपली भूमिका स्पष्ट सांगण्यास नकार देत आहे.
विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निष्ठावंत सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार असल्याची चर्चा असली तरी त्यांनी माहित नसल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे शेरकर यांनी म्हटले. अन्यथा महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपच्या आशा बुचके जुन्नर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींवर लक्ष असून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचे काम सुरू ठेवले आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे शरद सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे,
माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, माजी तालुकाप्रमुख तुषार थोरात, शिवसेना समर्थक अनंतराव चौगुले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली खंडागळे, नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, शरद चौधरी यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसली आहे.
घटक पक्षाबाबात बोलणे धर्मसंकट
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहून मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. त्यामुळे डॉ. कोल्हे यांच्यासमोर महाविकास आघाडीतील जुन्नर विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या घटक पक्षाच्या उमेदवाराबाबत आपले मत व्यक्त करणे धर्मसंकट बनले आहे.
अतुल बेनके पवार गटात जाणार का?
जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असले तरी ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास तसा विचार करू शकतात. तसे झाल्यास तालुक्यातील राजकारणाला मोठे कलाटणी मिळेल; परंतु आमदार बेनके यांना शरद पवार गटात घेण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे कितपत सहमती दाखवतात यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून आहे.
…तर ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात?
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मदत केली असून 51 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व असून महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.
कार्यकर्त्यांकडून लवकरच शिवसेनेच्या पदाधिकार्यांचा तालुका मेळावा आयोजित केला जाणार असून त्यामध्ये ठाकरे गटाचा निर्णय होणार असल्याचे नमूद केले. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उमेदवारी न मिळाल्यास भविष्यात तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात असून त्याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागेल.





