नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक भाजपमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. माजी आमदार आणि माजी महापौरांसह पाच बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशावरून भाजपमधील स्थानिक गटबाजी आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रक्रियेवर जाहीर नाराजी व्यक्त केली असून, माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ आणि घेराव – आज मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी मनसे, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मात्र, हे नेते कार्यालयात येत असतानाच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना घेराव घातला. बाहेरील नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘कार्यकर्ते कोण राहणार?’ फरांदेंचा सवाल – आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला अनुपस्थित राहून आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या अत्यंत भावूक झाल्या. फरांदे म्हणाल्या की, “मी नाराज नाही, पण हे माझे मत होते. आगामी निवडणुकीसाठी आमचे पॅनल तयार होते. गेल्या ४० वर्षात मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही, मी पक्षाची निष्ठावान आहे. पण जर सर्वांनाच नेते व्हायचे असेल, तर पक्षात कार्यकर्ते कोण राहणार? हा प्रश्न मला पडला आहे.” बोलताना फरांदे यांचे डोळे वारंवार पाणावत होते, ज्यामुळे त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. गिरीश महाजन यांचा विश्वास – दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांनी ही नाराजी फेटाळून लावत विजयाचा विश्वास व्यक्त केला. “भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. आज दिनकर पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकीत आमचे १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील,” असे महाजन यांनी नमूद केले. ‘श्रीमंत भिकाऱ्याची लक्षणे’ – संजय राऊतांची टीका नाशिकमधील या घडामोडींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. “इतरांचे आमदार-खासदार फोडून आपल्या पक्षात घेणे ही ‘श्रीमंत भिकाऱ्याची’ लक्षणे आहेत. देवेंद्र फडणवीस ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, त्यांनाच आता गिरीश महाजन आपली गँग बनवण्यासाठी पक्षात घेत आहेत,” असा टोला राऊतांनी लगावला. या नेत्यांचा पक्षप्रवेश – दरम्यान, आज गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्व पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या निष्ठावंत भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.