Anand Kale : ‘तू होतीस म्हणून मी आत्ता इथे आहे’; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट
Anand Kale : पत्नीचे कौतुक करताना आनंद काळे यांनी एकत्र घालवलेल्या ३७ वर्षांच्या प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला.

Anand Kale : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आनंद काळे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी राधा यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टमधून त्यांनी पत्नीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या खंबीर साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पत्नीचे कौतुक करताना आनंद काळे यांनी एकत्र घालवलेल्या ३७ वर्षांच्या प्रवासातील आठवणींनाही उजाळा दिला.
‘तू होतीस म्हणून मी आज इथे आहे’; पत्नीबद्दल आनंद काळेंची भावुक पोस्ट ( Anand Kale)
आनंद काळे यांनी आपल्या पोस्टमध्ये पत्नी राधा यांचा उल्लेख प्रेमाने ‘माझी राधा’ असा केला आहे. लग्नाची ३१ वर्षे आणि त्याआधीची सहा वर्षे अशा एकूण ३७ वर्षांच्या सहवासात राधा यांनी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ दिल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेत्याने लिहिले की, सुरुवातीच्या संघर्षापासून ते आजपर्यंत पत्नीने त्यांना खंबीर साथ दिली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी स्वीकारत तिने सर्वांची काळजी घेतली. आई-वडिलांपासून ते मुलांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्याबद्दल त्यांनी राधा यांचे विशेष कौतुक केले.
‘तू होतीस म्हणून मी आज इथे आहे,’ असे म्हणत आनंद काळे यांनी पत्नीच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तिच्या समजूतदारपणाला सलाम करत त्यांनी तिच्यातील निरागसपणा असाच कायम राहावा, अशी भावनाही व्यक्त केली.
सकाळची पूजा ते रात्रीची पार्टी; राधा यांच्या स्वभावाचे केले कौतुक (Anand Kale)
पत्नीच्या स्वभावातील विविध पैलूंचा उल्लेख करताना आनंद काळे यांनी तिच्या दिनचर्येपासून ते आनंदी वृत्तीपर्यंत अनेक गोष्टींचे कौतुक केले. सकाळी तीन तास स्वामींची पूजा करण्यापासून ते रात्री चार तास पार्टी करण्यापर्यंत तिच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळेपण असल्याचे त्यांनी मजेशीर अंदाजात नमूद केले.
View this post on Instagram
पोस्टच्या शेवटी त्यांनी ‘आय लव्ह यू राधा’ असे म्हणत पत्नीवरील प्रेम व्यक्त केले. त्यांच्या या पोस्टमधून पती-पत्नीमधील जिव्हाळा आणि दीर्घ सहजीवनातील परस्परविश्वास दिसून येतो.
‘चार दिवस सासूचे’ मालिकेमुळे मिळाली घराघरांत ओळख
आनंद काळे यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, मराठी टेलिव्हिजन मालिकांनी त्यांना घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली. ईटीव्ही मराठीवरील ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘अशोक देशमुख’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली. याशिवाय, झी मराठीवरील ऐतिहासिक मालिकेत त्यांनी साकारलेली ‘कोंडाजीबाबा फर्जंद’ ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची ठरली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील ‘विश्वजीत काका’ या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा झी मराठी पुरस्कारही मिळाला.
अभिनयासोबत व्यवसायातही जमवली ओळख
आनंद काळे यांनी ३५ हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून, ‘पी से पीएम तक’ या हिंदी चित्रपटातही भूमिका साकारली आहे. त्यांनी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.





