त्याने भारतीय संघात पुनारगमन केले तर मला सर्वाधिक आनंद होईल – कोहली

मुंबई – यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. ते पाहता येत्या काळात त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी निश्चितच आहे, असा विश्वास रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत कार्तिकने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे. संघाच्या प्रत्येक विजयात त्याचे मोठे योगदान आहे. कार्तिक फिनिशरची भूमिका पार पाडत आहे. आतापर्यंत आम्ही खेळलेल्या सामव्यांत तो केवळ एकदाच बाद झाला आहे. त्याने याच कामगिरीत सातत्य राखले तर भारतीय संघाची निवड समिती त्याच्या नावाचा निश्चितच वितार करेल, असेही कोहलीने सांगितले.
कार्तिकने यंदाच्या मोसमात सहा डावांत 209.57 च्या स्ट्राईक रेटने 197 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली. हा सामना बेंगळुरुने 16 धावांनी जिंकला. सध्या सर्व संघातील यष्टीरक्षक फलंदाज पाहिले तर ऋषभ पंत व कार्तिक यांनीच सातत्याने सरस कामगिरी केली आहे.
2004 साली भारतीय संघात पदार्पण केल्यावर तब्बल 18 वर्षे तो खेळत आहे. त्याची खेळाची आवड व क्षमतेपेक्षा जास्त सरस कामगिरी करण्याची जिद्द निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याच्या फलंदाजीचा मी देखील चाहता आहे. त्याने भारतीय संघात पुनारगमन केले तर मला सर्वाधिक आनंद होइल, असेही कोहली म्हणाला. कार्तिक 36 वर्षाचा असून त्याने आतापर्यंत 36 कसोटी, 94 एकदिवसीय व 32 टी 20 सामने खेळले आहेत.





