Laxman Hake : मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट, ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार?

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेल्या वातावरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून खळबळ उडवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत असलेल्या हाके यांनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत देत, उद्या (२७ सप्टेंबर) दैत्यनांदूर ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथील ओबीसी मेळाव्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ओबीसी समाजात चर्चेला उधाण आले आहे.
हाके यांची फेसबुक पोस्ट काय?
हाके यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या संघर्षाची व्यथा मांडली असून, “मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही. हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली.
उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत,” असे भावनिकपणे सांगितले. तसेच, “मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही,” असा उल्लेख करत धमक्या आणि हल्ल्यांबद्दल सूचित केले.
या पोस्टच्या शेवटी हाके म्हणतात, “मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो.” यामुळे ओबीसी आरक्षण लढ्यातून हाके माघार घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यापूर्वी हाके यांना फोनद्वारे धमक्या मिळाल्याचे आणि ओबीसी नेत्यांकडून डावलले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि पवार कुटुंबावर त्यांची जोरदार टीका करताना ते ओबीसी आरक्षण ओबीसी कोट्यातून मराठ्यांना देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना विरोध करत आले आहेत.
मराठा समाज ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी २०१९ मध्ये ओबीसी संघर्ष सेना स्थापन करून अनेक आंदोलने केली. जून २०२४ मध्ये जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण केले, तर ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईत धरना दिली.
नुकत्याच झालेल्या बारामतीतील आंदोलनात गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांनी सरकारवर आरोप केले. हाकेंच्या या पोस्टमुळे ओबीसी समाजात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, उद्याच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हाकेंची भूमिका धमक्यांमुळे की ओबीसी नेत्यांच्या डावलण्यामुळे, हे स्पष्ट होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.





