मुंबई – मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला असून संपूर्ण मुंबई शहर बॉम्बने उडवण्याची धमकी थेट देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी’ कंपनीशी संबंधित असल्याचे सांगून ही धमकी असून मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत आणि आपण ‘डी कंपनी’चा सदस्य आहोत, असा दावा देखील फोन करणार्या व्यक्तीने केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा फोन आल्यानंतर पोलीसांनी आपल्या यंत्रणा कामाला लावल्या आणि स्थानिक पोलिसांसह, बॉम्बशोधक पथकाला या विषायाची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही तपास केला मात्र, कुठेही संशयास्पद काहीच आढळले नाही. तांत्रिक विश्लेषणाद्वारे फोन करणाऱ्याचे लोकेशन देखील पोलीसांनी लगेचच शोधून काढले. मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला हा फोन मंगळवारी २:३० च्या सुमारास आला होता. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव सूरज जाधव असे असून तो बोरिवलीचा रहिवासी आहे. पोलिसांना अधिक चौकशी केली असता, यापूर्वी देखील आरोपीने अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन केला असल्याचे अढळून आले आहे. पोलीसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. मागील धमकीच्या प्रकरणात देखील आरोपीला अटक करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून सातत्याने असे धमकीचे फोन येताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता. विमान कंपन्यांना देखील असे धमकीचे फोन येताना दिसून आले आहेत. यामुळे विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आरोपीने फोन करून म्हटले होते की, “मी डी (दाऊद) टोळीचा आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत..आणि यानंतर अचानक फोन कट करण्यात आला.