“मी गांधींजींचा भक्त, वाईट पाहत नाही”; किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ प्रकरणावर संजय राऊतांचे विधान

मुंबई – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. यानंतर आज बुधवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “मी गांधींजीचा भक्त आहे. मी वाईट पाहत नाही आणि वाईट ऐकतही नाही. परंतु, वाईटाचा अंत नक्कीच करतो. आमच्यावर संस्कार आहेत. या राज्याची परंपरा आहे. बाळासाहेबांनी सांगितले आहे, की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. त्यांना पत्नी आहे, मुलं आहेत. त्यांनी कोणतं पाप केलं असेल तर त्यांना भोगावं लागेल. मी का बोलू?” असा सवालही राऊतांनी केला.
देशातील विरोधी पक्षांची काल संयुक्त बैठक बंगळुरूत पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी २६ पक्षांच्या आघाडीला INDIA अर्थात Indian National Development Inclusive Alliance असे नाव दिल्यानंतर भाजपने टीका करण्यास सुरुवात केली. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “नऊ वर्षांत एनडीए आठवली नाहीत. मित्र पक्ष आठवले नाहीत. परंतु, आम्ही एकत्र आल्यावर त्यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएच्या लोकांनी मोदींचा सत्कारच केला पाहिजे. फक्त मोदींनाच वोट फॉर इंडिया बोलण्याचा अधिकार नाही. मोदी इज इंडिया, हा इंडियाचा अपमान नाही का? मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया आहे असं म्हटलं, याचा अर्थ काय होतो? मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे.”
पुढे ते म्हणाले, “इंडिया आमचा परिवार आहे. देशात ज्यारितीने हुकुमशाही सरकार चालवले जाते आहे, त्याविरोधात इंडिया लढणार आणि जिंकणार. तुम्ही इंडियाविरोधात षडयंत्र करत आहात. तुमच्यासोबत असणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सिंचन घोटाळा, इक्बाल मिर्चीसोबत असणारे एकत्र आले. इंडिया एकत्र आल्यावर एनडीएची आठवण झाली. हे ढोंग बंद करा. हे ढोंग लोकांना कळत आहे.” यावेळी खासदार संजय राऊत यांनी विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचेही सांगितले आहे.





