Sunetra Pawar : ‘मी मराठवाड्याची लेक’; शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या सुनेत्रा पवार, शेतकऱ्यांना दिला मदतीचा शब्द
Sunetra Pawar : लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड परिसरातील पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.

Deputy Chief Minister Sunetra Pawar visited the farmers’ fields : “मी मराठवाड्याची लेक आहे. या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वेदना मला चांगल्या प्रकारे समजतात. कोणत्याही शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड परिसरातील पावसाच्या अनिश्चिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बारूळ फाटा येथील शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट देत त्यांनी ९ जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. पिकाची सद्यस्थिती, झालेली वाढ, संभाव्य उत्पादन तसेच पावसातील खंडामुळे पिकावर झालेल्या परिणामांची माहिती त्यांनी घेतली.
सुनेत्रा पवार म्हणाल्या…
“शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण, जनावरांचा चारा आणि संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा राज्य शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींच्या या काळात शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
प्रशासनाला तातडीने उपाययोजनांचे आदेश
स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत आणि आवश्यक उपाययोजना मिळाव्यात यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, राज्यातील ३६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत होत असतानाच विरोधकांकडून त्याच्या निकषांवर आणि अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, मात्र प्रत्यक्ष मदत आणि उपाययोजनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता लक्ष लागले आहे.





