Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ मे ते ४ मे दरम्यान मुंबईतील वरळीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी ‘राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ असे म्हणत आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार ? यावेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी, असे मत मांडले. त्यावर आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. ममता बॅनर्जी झाल्या, जयललितांनी स्वत:च्या ताकदीवर तामिळनाडूत अनेकदा राज्य मिळवलेलं बघितलं. त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे पाहिलं, असे अजित पवार म्हणाले. “कित्येक महिलांची नावं देशातील वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री झालेली घेता येतील. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते होईल. कारण हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता जिजाऊंचा,सावित्रीबाई फुले, रमाई माता, तारा राणींचा महाराष्ट्र आहे. या अशा अनेक महिला या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत, त्यांचं कर्तृत्व महिलांनी बघितलं आहे, त्यामुळं तो दिवस फार लांब असेल, असं मला वाटत नाही, “असं अजित पवार यांनी सांगितलं. Ajit Pawar | “आम्ही पण महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री यांनी महायुती सरकारचा १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्यात अदिती तटकरे यांच्या खात्याला पहिला क्रमांक मिळाला. महिला कुठं मागं नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं, असेही अजित पवार म्हणाले. मनभेद होता कामा नये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या केल्या व या राज्याला सुसंस्कृत राजकारण दिले त्यांचा वारसा घेऊन काम करत आहेत. अनेक महिलांचे कर्तुत्व राज्याने पाहिले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावे, मनभेद होता कामा नये. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ज्यांनी योगदान दिले, त्यांचा उद्या गौरव करणार आहे. हा राज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणार आहे. महाराष्ट्रानं नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हाच वारसा पुढं नेण्याचं काम करतोय, असंही अजित पवार यांनी सांगितलं. Ajit Pawar | हेही वाचा: प्रतीक्षा संपली…! लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री अदिती तटकरेंची माहिती