पुणे जिल्हा | खडकवाडीत झोपड्या आगीत भस्मसात

लोणी धामणी, (वार्ताहर)- खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील वडदरावस्ती येथे संतोष रामदास पडवळ व बबुशा वामन पडवळ या आदिवासी ठाकर समाजातील या दोन शेतमजुरांच्या शेताच्या कडेला असलेल्या झोपड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्या. त्यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
सुदैवाने १० वर्षांच्या मुलीला आग लागल्याचे समजल्याने झोपडीत झोपलेल्या तिच्या आईला उठवल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत.
मूळचे पहाडदरा (ठाकरवाडी) येथील संतोष पडवळ व बबुशा पडवळ हे दोघेही खडकवाडी येथे शेती अर्धलीने करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दोघांचीही कुटुंबे शेताच्या कडेला झोपडी करून राहतात. दोन्ही कुटुंबे मिळून एकूण नऊ व्यक्ती आहेत. बुधवारी सर्वजण शेतात गेले होते, तर बबुशा पडवळ यांच्या पत्नी पूनम या आजारी असल्याने झोपडीमध्ये झोपल्या होत्या.त्यांच्या बरोबर त्यांची १० वर्षांची मुलगी भारती होती.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारती झोपडीच्या बाहेर आली असता तिला झोपडीला आग लागल्याचे दिसले. तिने तिच्या आईला उठवूनबाहेर आणले. त्यांनी आरडाओरडा केल्याने शेतात काम करणारे संतोष पडवळ व बबुशा पडवळ धावत आले.झोपडीत दोन गॅस सिलिंडरच्या टाक्या असल्याने जवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते. जवळच राहणारे ग्रामपंचायत सदस्य गुरुदेव पोखरकर हे ही घटनास्थळी आले. त्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांना मोबाईलवरून माहिती दिली.
त्यांनी भीमाशंकर साखर कारखान्याचा पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवला. टँकरने आग पूर्णत: आटोक्यात आणली. संतोष कुरकुटे, पहाडदऱ्याचे पोलीस पाटील नीलेश भालेराव, गुरुदेव पोखरकर, अनिल सुक्रे, सूर्यकांत देशमुख, ज्ञानेश्वर डोके, सुरेश सुक्रे, दत्तात्रेय भागवत, बाबाजी डोके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
तोपर्यंत दोन्ही झोपड्यातील १० पोती धान्य, कपडे, दोन भुईमुगाच्या शेंगाची पोती, टीव्ही तसेच संसारोपयोगी सर्व साहित्य, लहान मुलीचे कानातील सोन्याचे दागिने व पायातील चांदीचे पैंजण व संतोष पडवळ व बबुशा पडवळ या दोघांनीही शेतातील गवार व फ्लावर विक्रीतून आलेले प्रत्येकी दोघांचे ४५ते ५० हजार रुपये, असे दोघांचे मिळून रोख सुमारे ९० हजार रुपये जळून खाक झाले.
अशा प्रकारे दोन्ही शेतमजुरांचे एकूण सुमारे दोन लाख रुपये नुकसान झाले. पारगाव कारखाना पोलीस तसेच तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.तीन दिवसांपूर्वी झोपडीमध्ये कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने झोपडीतील अंगावरचे कपडे राहिले दोन्ही झोपड्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या टाक्या होत्या.सुदैवाने त्यांचे स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटन टळली. आगीत झोपडीतील सर्व साहित्य अगदी मुलांचे शाळेतीतील दप्तरसुद्धा जळून खाक झाल्याने दोन्ही कुटुंबातील सर्वांचे फक्त अंगावरील कपडे राहिले आहे.
आग लावल्याचा संशय
दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्ती झोपडीजवळ संशयास्पद हालचाल करताना दिसल्याने शेतातून पडवळ यांनी आवाज दिल्याने ती व्यक्ती पळून गेली होती. ती व्यक्ती कपडे फाडून निघून गेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणूनबुजून आग लावली असल्याचा अंदाज दोन्ही पडवळ कुटुंबाने व्यक्त केला आहे.





