जिवंतपणी सांभाळ करण्यास नकार; पण मृत्यूनंतरही तो नातेवाइकांना नकोसाच

पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाने भूपाल थापा याची फुफ्फुसे निकामी झाली होती. ऑक्सिजनशिवाय एक तासापेक्षा अधिक तो जिवंत राहू शकत नव्हता. त्याची प्रकृती खालावत गेली आणि मंगळवारी (दि. 22) त्याने अखेरचा श्वास घेतला. जिवंतपणी पत्नी, बहीण भावाने त्याचा सांभाळ करण्यास नकार दिला होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतरही तो नातेवाइकांना नकोसा झाला आहे.
मृत्यूनंतर सर्व वैर संपुष्टात येते, असे आपण ऐकत आलो आहोत. मात्र याच्याच उलट अनुभव सध्या रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेला आला. 15 वर्षांपूर्वी शहरात आलेला भूपाल थापा (वय 34) हा आळंदीजवळील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. जुलै 2021 मध्ये त्यास करोनाची लागण झाली. या आजारात त्याची फुफ्फुसे निकामी झाली. कृत्रिम ऑक्सिजनशिवाय तो केवळ एकच तास जिवंत राहू शकत होता. तो मूळचा नेपाळचा असून त्याची पत्नी दार्जिलिंग तर बहिण पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याला दोन भाऊ असून ते नेपाळमध्ये आहेत. तो वायसीएम रुग्णालयात असताना रिअल लाइफ रिअल पीपलचे अध्यक्ष एम. ए. हुसेन यांनी त्याच्या सर्व नातेवाइकांशी संर्पक केला. मात्र सर्वांनी त्याचा सांभाळ करण्यास नकार दिला.
प्रभातच्या वाचकांचे प्रयत्न
त्याला जास्त दिवस वायसीएम रुग्णालयात ठेवणे अशक्य असल्याने त्याला पिंपरी शेल्टरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो जगावा यासाठी वायसीएम रुग्णालयाने त्यास कृत्रिम ऑक्सिजन किट दिले. शेल्टर हाऊसमध्ये ऑक्सिजन किटसाठी अखंड वीजपुरवठा हवा होता. त्याच्या प्रत्येक श्वासासाठी किंमत मोजावी लागत होती. त्याचे श्वास सुरू राहावेत यासाठी पैशांची गरज होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करुन दै. “प्रभात’ने नागरिकांना आवाहन केले. त्याच्या श्वासांसाठी प्रभातच्या वाचकांनी भरभरून मदत केली. ही मदत आणि रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या प्रयत्नांवर तीनमहिने त्याचे श्वास सुरू होते. परंतु मानसिक दृष्ट्या खचलेल्या थापाने मंगळवारी रात्री श्वास घेणे थांबविले.
अंत्यसंस्कारासही नकार
मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर रिअल लाइफ रिअल पीपलचे अध्यक्ष हुसेन यांनी थापा याच्या नातेवाइकांशी संपर्क करून त्याचे निधन झाल्याचे सांगितले. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह मोफतच्या रुग्णवाहिकेतून तुमच्याकडे पाठवू का, अशी विचारणाही केली. मात्र पत्नी, बहीण आणि दोन भावांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यामुळे मृत्यूनंतरही तो नातेवाइकांना नकोसा झाल्याची भावना हुसेन यांनी व्यक्त केली. अखेर रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेने भूपाल थापा याच्यावर अंत्यसंस्कार केले.





