Indapur Farmer Protest – खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्याला शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी आज कळस, रूई, न्हवी, कौठळी, व्याहळी, तरंगवाडी आदी गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदत उलटूनही पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला होता. अखेर, वरिष्ठ पातळीवर आजच तातडीची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. तालुक्यातील शेती पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. या पार्श्वभूमीवर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी १२ तारखेला शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देऊन पाणी सोडण्याचे कबूल केले होते. मात्र, आज १८ तारीख उजाडली तरी कालव्याला पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध करत आज शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महामार्ग रोखून धरला. “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकार आणि पाटबंधारे विभागाचा तीव्र निषेध केला. या आंदोलनामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. खडकवासला धरण. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता काही काळ घटनास्थळी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती. शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर प्रशासनाला झुकणे भाग पडले. कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी आजच जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा “प्रशासनाने १२ तारखेला दिलेले लेखी आश्वासन न पाळणे हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. आज होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र असेल, तसेच पाणी मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.