Pimpri | आगीत शेकडो रोपे जळून खाक….

पिंपरी, – पर्यावरण प्रेमींनी लावलेली रोपे समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि. २८) सकाळी पिंपळे निलख येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने पिंपळे निलख येथील पिंपळवन भागात शेकडो झाडे लावली आहेत.
पावसाळ्यानंतर ही झाडे जगावीत म्हणून पाणी घातले जात होते. मात्र काही समाजकंटकांनी येथील गवताला लाग लावली. या आगीत रोपण केलेली शेकडो रोपे जळून खाक झाली. यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. समाजकंटक असेच दरवर्षी डोंगराला माळ रानाला आग लावतात. यामुळे वनसंपत्ती आगीच्या भक्षस्थानी पडते. पिंपळे निलख येथे लावलेली शेकडो झाडे जळून खाक झाली. अनेक छोटे छोटे जीव होरपळून मेले. अग्निशामक दल आणि पर्यावरण प्रेमींनी धावपळ केली आग विझवली पण तोपर्यंत अनेक झाडे जळाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इसीएचे सिंकदर घोडके यांनी सांगितले की, गवत संपूर्ण जळाले आहे, यात असंख्य लहान-मोठे जीव असतात. या जिवांना देखील प्राणाला मुकावे लागली. हे जीव पर्यावरण चक्रासाठी खूपच गरजेचे असतात. दरवर्षी येथे झाडे लावली जातात, पर्यावरणप्रेमी त्यांचे संगोपन देखील करतात. परंतु कुणीतरी येऊन आग लावून देते आणि पर्यावरणप्रेमींच्या कष्टांसह रोपे, झाडे आणि त्यांच्यासोबतचे असंख्य जीव होरपळून मृत पावतात. हिवाळा सुरु झाला की नेहमीच कुठे ना कुठे तरी हे पहावयास मिळते, हे कुठेतरी थांबले पाहिजे.





