‘हम दो हमारे बारह’चा वाद थांबेना ! सिनेमाच्या टीमला एकनाथ शिंदेंकडून आश्वासन, म्हणाले…

Hum Do Hamare Baarah | Annu Kapoor । Eknath Shinde : अभिनेते अन्नू कपूर यांचा आगामी ‘हम दो हमारे बारह’ चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनकडून विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘हम दो हमारे बारह’ 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाल्यानंतर 7 जून रोजी रिलीज होणार आहे.
मात्र, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रझा अकादमीकडून विरोध करण्यात आला होता. सध्या चित्रपटाला वेगवेगळ्या ठिकाणांहून विरोध होत असताना चित्रपटातील कलाकारांना एका अज्ञाताकडून धमकीचा फोन आला असल्याची माहिती खुद्द अभिनेता अन्नू कपूरने दिलेली आहे.
धार्मिक भावना दुखवणारे काही सीन्स टीझरमध्ये दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या चित्रपटाला धार्मिक संघटनेकडून विरोध केला जात आहे. सोशल मीडियावरून टीझर आणि ट्रेलरही त्वरित डिलीट करण्यात यावा, अशी मागणी रझा अकादमीचे सदस्य सईद नुरी आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, अश्यातच अभिनेते अनु कपूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याविषयी बोलताना अनु कपूर म्हणाले की, “हमारे बारह हा चित्रपट येत्या 7 जूनला प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. कोणतीही काळजी न करता चित्रपट प्रदर्शित करावा, असं ते म्हणाले.
चित्रपटाचं पोस्टर ही फक्त एक झलक असते. प्रमोशनसाठी ते वापरलं जातं. पण त्यावरून चित्रपटाच्या टीमला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची विनंती केली आहे. आमच्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. धमक्यांप्रकरणी चौकशी होईल आणि आरोपींवर कारवाई करण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.” असं अभिनेता म्हणाला.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केले असून चित्रपट येत्या 7 जून रोजी चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, अन्नू कपूर, पार्थ समथान, आश्विनी कळसेकर, मनोज जोशी, पारितोष त्रिपाठी, राहूल बग्गा सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.





