Ganeshotsav 2022 : उत्सवाचा अपूर्व उत्साह ! पुण्यातील मध्यवस्तीसह उपनगरांत खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 30 -सलग दोन वर्षे गणेशोत्सवावर करोनाचे सावट होते. त्यामुळे आलेली मरगळ झटकून पुण्यातील व्यापारी आणि ग्राहकांनी यंदा अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शनिवार, रविवार या वीकेन्डचा मुहूर्त शिवाय सोमवार आणि मंगळवारी रात्रीपर्यंत शहरातील मध्यवस्तीसह उपनगरांत खरेदीची रेलचेल दिसून आली.
पत्री, फूल-फळांचे बाजार, लाइट माळा-रोषणाई साहित्य, सजावटीचे साहित्य, प्रसाद-मिठाईचे साहित्य याची मोठी उलाढाल दिसून आली. शिवाय, जवळपास गेल्या महिन्याभरापासून गणेशमूर्तींचे स्टॉल्स बाजारपेठांमध्ये लागले होते. साजिरी मूर्ती घेण्यासाठी अनेक भाविकांनी याठिकाणी गर्दी केली होती. आता ही लगबग आता बहुतांश संपली आहे. शनिवारवाड्याजवळ जे स्टॉल लावण्यात आले होते. तेथील बऱ्याच मूर्ती संपल्याने त्यांनी सोमवारी रात्रीच स्टॉल उतरवून घेतले. गेल्या आठवडाभरात मंडईसह रविवार पेठ, बोहरी आळी, कापडगंज यांसह बुधवार पेठेतील मोती चौक ते पासोड्या विठोबा मंदिर चौक परिसरातील विद्युत रोषणाईचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने रोषणाईमुळे उजळून गेली होती. तर, काही वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले.
नेते मंडळी “बिझी’
मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, ध्वजपथक, शंखनाद पथक अशी अनेक पथके सार्वजनिक मंडळांनी सामील करून घेतली आहेत. त्यामुळे किमान तीन ते चार तास ही मिरवणूक चालणार आहे. याशिवाय शहरातील मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन काही मंडळांनी केले आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्लीतील नेत्यांपर्यंत अनेकजण या कार्यक्रमांमध्ये “बिझी’ असणार आहेत.





