Pune District : लेण्याद्रीत भाविकांची अलोट गर्दी
Pune District : संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणपतीच्या मूर्तीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6.15 वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा विधिवत अभिषेक आणि महापूजा करण्यात आली.

लेण्याद्री : संकष्ट चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गुरुवारी हजारो भाविकांनी ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी सुरू झाली होती. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नाशिक आणि जुन्नर परिसरातील विविध गावांतून आलेल्या भाविक व पर्यटकांमुळे लेण्याद्री परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणपतीच्या मूर्तीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6.15 वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा विधिवत अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी 7, दुपारी 12 आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती झाली. रात्री चंद्रोदयाच्या वेळीही श्रींची महाआरती करण्यात आली.
दौंड येथील विक्रम पांडुरंग दिवेकर यांनी श्रींच्या नैवेद्यासाठी दोन कॅरेट केळी अर्पण केली. वारकरी संप्रदायाचे वै. ह. भ. प. लक्ष्मण केरू भोसले यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शिवेचीवाडी येथील श्री मुक्ताई प्रसादिक भजनी मंडळाने संगीतमय भजनसेवा सादर केली. रात्री जुन्नर येथील खालचा माळीवाडा परिसरातील जय गणेश ग्रुप आणि के. एम. ग्रुप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे आणि आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.
या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई आणि व्यवस्थापक निलेश सरजिने यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकष्ट चतुर्थीचा सोहळा उत्साहात पार पडल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे आणि सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.





