विजयी मेळाव्याला तुफान गर्दी; वरळी डोममध्ये जल्लोषाचे वातावरण

Raj Thackeray – Uddhav Thackeray | मराठी भाषेच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंचा मुंबईत एकत्रित विजयी मेळावा होत आहे. हिंदी सक्तीनंतर दोन्ही बंधुनी एकत्र येत याचा कडाडून विरोध केला. यानंतर सरकारला गुडघ्यावर बसून हा शासन निर्णय रद्द करावा लागला. याचाच विजय मेळावा आज मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडत असून तब्बल 19 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. मात्र या मेळाव्यासाठी वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.
वरळी डोमच्या आसपास नुसता जनसागर उसळलेला दिसत आहे. पोलिसांना देखील गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. यावेळी बाळा नांदगावकर यांनी पोलिसांशी चर्चा करून आत सोडण्याची विनंती केली. यानंतर गर्दी थेट डोमच्या दिशेने आत गेली. या गर्दीवरूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याचा अंदाज येऊ शकतो.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मुंबईतील वरळी डोम येथे प्रचंड गर्दी झालेली असल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. हे प्रवेशद्वार आता उघडणार नसल्याचे सांगत बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांसाठी खास सोय करण्यात आली असून त्यांच्यासाठी स्क्रिन लावण्यात येत आहेत. Raj Thackeray – Uddhav Thackeray |





