HSRP Number Plate : वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून भरावा लागणार दंड; RTO सेवाही होणार बंद
HSRP Number Plate : अनेकांनी अद्याप नोंदणी न केल्याचे समोर

HSRP Number Plate : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे वाहनधारकांकडे नियमांचे पालन करण्यासाठी आज अखेरची संधी असून, १ जुलैपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जाणार आहे.
मुदत संपल्यानंतर पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाई सुरू करणार आहेत. याशिवाय HSRP नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अनेक महत्त्वाची कामेही बंद केली जाणार आहेत. (HSRP Number Plate )
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या तरतुदीनुसार नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांना 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. इतर नियमभंगही आढळल्यास संबंधित कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता आहे.
आरटीओमधील सेवा होणार बंद (HSRP Number Plate )
HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना 1 जुलैपासून आरटीओसाठी देखील मनस्ताप सहन करावा लागू शकतो. अशा वाहनांचे हस्तांतरण, पत्ता बदलणे, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुर्ननोंदणी, वाहनातील इतर बदल, परवाना नूतनीकरण यांसारख्या कोणत्याही आरटीओ सेवा उपलब्ध होणार नाही. मात्र, वाहनधारकांना तात्पुरता दिलासा म्हणून वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी सध्या ही अट लागू राहणार नाही.
अपॉइंटमेंट घेतलेल्यांना तात्पुरता दिलासा ( HSRP Number Plate )
दरम्यान, ज्या वाहनधारकांनी 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, अशा वाहनधारकांना 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही, त्यांना थेट दंडाचा सामना करावा लागेल.
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्याचे तीन झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज, रिअल इंडस्ट्रीज आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स या अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी केवळ अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून अधिकृत केंद्रावरच नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले.
हेही वाचा:
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेचा खुलासा; शाहरुख खानमुळे मिळालं पहिलं घर





